नगर : महिला महाविद्यालय रस्त्यासाठी 1.66 कोटी | पुढारी

नगर : महिला महाविद्यालय रस्त्यासाठी 1.66 कोटी

नगर; पुढारी वृत्तसेवा : राधाबाई काळे महाविद्यालय रस्ता व नटराज हॉटेल ते एसटी वर्कशॉपपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण्यासाठी सुमारे एक कोटी 66 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. आमदार संग्राम जगताप म्हणाले, शहर विकासाचे पन्नास वर्षांचे कायमस्वरूपी नियोजन करून विकास कामे सुरू केली आहेत.

विकासकामांच्या निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याने टप्प्याटप्प्याने विकास कामासाठी निधी प्राप्त होत आहे. पाण्याची लाईन, बंद पाईप गटार योजनेची कामी हाती घेतली आहेत. त्यानुसार शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महाविद्यालयाकडे तारकपूर बस स्थानकापासून जाणार्‍या रस्त्या काँक्रिटीकरणासाठी 1 कोटी 16 लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे.

नटराज हॉटेलचे एसटी वर्कशॉप पर्यंतच्या रस्त्या काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून 50 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राधाबाई काळे महाविद्यालयाचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ये-जा करीत असतात. खराब रस्त्यांमुळे विद्यार्थिनींना वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे गरजेचे होते. त्याचबरोबर एसटी वर्कशॉप ते नटराज हॉटेलचा हा रस्ता औरंगाबाद महामार्गाला जोडणारा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दळणवळण होत आहे. नगर शहरातील नागरिकांचा सुखकर प्रवास व्हावा यासाठी रस्त्यांच्या कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून जस-जसा निधी प्राप्त होईल तस-तसे रस्त्यांची कामे होणार आहेत.

Back to top button