नगर : ‘विद्युत’ला सभापती वाकळेंचा झटका | पुढारी

नगर : ‘विद्युत’ला सभापती वाकळेंचा झटका

नगर; पुढारी वृत्तसेवा : पथदिवे बसविणार्‍या संस्थेने नियम व अटींचा भंग केला असून, संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सभापती कुमार वाकळे यांनी पत्राद्वारे विद्युत विभागाकडे केली होती. परंतु, तीन महिन्यानंतरही इलेक्ट्रिक विभागाने त्यांना उत्तर दिले नाही. त्यावर सभापती व सदस्यांनी विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरले. अखेर विद्युत विभागावर कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेची स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्थायी समिती सदस्य विनीत पाऊलबुद्धे, गणेश कवडे, राहुल कांबळे, रुपाली वारे, गौरी नन्नवरे, ज्योती गाडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुर्‍हे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बाह्यसंस्थेद्वारे नेमणूक केलेल्या वायरमनची पुनर्नियुक्ती करण्याबाबतच्या विषयाला मंजुरी देत असताना सदस्यांनी विद्युत विभागावर आरोपाच्या फैरी झाडल्या.

सभापती वाकळे म्हणाले, शहरात ई स्मार्ट सोल्युशन लि. नाशिक या संस्थेने करारनाम्यातील अनेक अटी व शर्तीचा भाग केल्याने त्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, असे तीन महिन्यांपूर्वी पत्र दिले होते. त्यावर चार दिवसांपूर्वी स्मरणपत्र दिले तरीही विद्युत विभागाकडून त्या पत्राला उत्तर मिळाले नाही. मग विद्युत विभाग नेमके काय करतो.

त्या विभागातील कर्मचारी काय करतात, असे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर विद्युत विभागप्रमुख जोशी, इंजिनिअर जयेश कोके निरूत्तर झाले. अर्जावर तीन दिवसांत कार्यवाही होऊन उत्तर मिळणे अपेक्षित आहे. तीन महिने झाले तरी अधिकारी उत्तर देत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सभापती वाकळे यांनी केली. त्यानंतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

नापास विद्यार्थ्यांचा वर्ग आहे का?
विद्युत विभागातील अधिकार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी सभापती वाकळे यांनी केल्यानंतर त्यांना पहिली वेळ आहे, त्यांना ताकीद द्या, अशी सूचना उपायुक्त यशवंत डांगे यांनी मांडली. त्यावर वाकळे म्हणाले, सभापती बदलतील प्रत्येक वेळी ताकीद द्यायची म्हटल तर हा काय नापास विद्यार्थ्यांचा वर्ग आहे काय असा सवाल उपस्थित केला.

30 ते 40 टक्के वीजबिल बचत
स्मार्ट एलईडी बसविल्यानंतर मनपाचे 80 टक्के वीजबिल वाचेल असा दावा करण्यात आला होता. नेमकी किती बचत झाली असा सवाल नगरसेवक गणेश कवडे यांनी केला. त्यावर उपायुक्त डांगे म्हणाले, 35 हजार पथदिवे बसून झाले आहेत. त्यात साधारण 30 ते 40 टक्के विजेची बचत होत आहे.

वायरमनने सायंकाळी पाहणी करावी
बाह्यसंस्थेकडून दहा वायरमनची मनपाने नेमणूक केलेली आहे. पण, त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम होत नाही. अनेक प्रभागात पथदिवे बंद आहेत. ते अनेक दिवस बंद राहातात. नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केल्यानंतर पथदिवे सुरू होतात. मग नेमलेले वायरमन काय करतात असा सवाल नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, गणेश कवडे यांनी उपस्थित केला. त्यावर यापुढे दररोज सायंकाळी वायरमन प्रभागात पथदिव्यांची पाहणी करतील असे आश्वासन उपायुक्त डांगे यांनी दिले.

Back to top button