राहुरी : गटारीच्या खड्ड्यात मातीत दबून मजूर ठार | पुढारी

राहुरी : गटारीच्या खड्ड्यात मातीत दबून मजूर ठार

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : देवळाली प्रवरा येथे भूमिगत गटारीचे काम सुरू असताना सुमारे 10-15 फूट खोदकाम झालेल्या खड्ड्यामध्ये काम करणार्‍या एका 21 वर्षीय परप्रांतीय तरुणाच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धीरज पुनम भुसार (रा. जामपाणी, जि. खांडवा, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा हद्दीमध्ये भूमिगत गटार योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. शहर व वाड्या- वस्ती हद्दीत काम सुरू असताना नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचे व भूमिगत गटार योजनेचे काम करणार्‍या ठेकेदाराने कोणत्या न कोणत्या कारणातून खटके उडतच होते. काल (दि. 5) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास वीट भट्टी परिसरात पटारे वस्ती येथे गटार योजनेच काम सुरू होते.

पोकलॅन व जेसीबीद्वारे अंदाजे 10-15 फूट खोलीचे खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. पाईप टाकताना खड्ड्याची समान पातळी मोजण्यासाठी परप्रांतीय मजूर धीरज भावसार खड्ड्यात उतरलेला होता. पातळी मोजकाम सुरू असतानाच मातीचा ढीग पडला. मोठ्या प्रमाणात माती अंगावर ढासळल्याने तरूण खड्ड्यातच गुदमरला. याप्रसंगी इतर कामगारांनी आरडा- ओरड करताच यंत्रणेने धाव घेतली.

सुमारे अर्धा तास तरुणाला खड्ड्याबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. जेसीबीने माती बाहेर काढून त्या तरूणास खड्ड्यातून बाहेर काढले. रवी देवगिरे यांनी रुग्णवाहिकेतून ऑक्सिजन पुरवठा केला. अनंत कदम, शैलेंद्र कदम, सचिन कोठूळे, अजित चव्हाण, सचिन सरोदे यांनी मदतकार्यात योगदान दिले. त्याला रुग्णालयात हलविले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Back to top button