कर्जत बसस्थानकासह चौकावर राहणार वॉच

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : चोर्यांसह छेडछाडीसारख्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी लोकसहभागातून तालुक्यातील अनेक गावांत, तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. कर्जत बसस्थानकात 12 व कुळधरण चौकात 4 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कर्जतच्या शाळा-महाविद्यालयात तालुक्यातील विविध गावांमधून दररोज हजारो विद्यार्थिनी बसमधून ये-जा करतात. या मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत.
पोलिसांनी अनेक टवाळखोरांना चोप देत प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलची हवा दाखविली आहे. कर्जत बसस्थानकात प्रवाशांचीही मोठी रेलचेल असते. बसमध्ये चढताना-उतरताना पैशांचे पाकिट, पिशव्या, मोबाईल, दागिने, तसेच बाहेर लावलेली दुचाकी वाहने चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी अनेक चोरटे जेरबंद केले आहेत. मात्र, अनेकवेळा लहान-मोठ्या गुन्ह्यांत नागरिकांना पुराव्याअभावी न्याय मिळत नाही. तसेच तपासात मोठी अडचण निर्माण होते.
त्यामुळे अशा प्रकारांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पोलिस निरीक्षक यादव यांनी या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे चोरट्यांना धास्ती बसली आहे. तसेच, छेडछाडीच्या गैरप्रकारांना आळा बसला आहे. कॅमेरे बसविण्यासाठी शिवाजी थोरात (कोळवडी), प्रवीण फलके (कर्जत), दादासाहेब थोरात (थेरवडी) यांनी आर्थिक योगदान दिले. त,र वाय जी इन्फोटेकचे योगेश गांगर्डे (कोंभळी) यांनी कुळधरण चौकात कॅमेरे बसविले. शिवाजी देशमुख (आळसुंदे) यांनी बसस्थानक येथील कॅमेरे बसविले.