शिळेचा देगलूर ते भगवानगड प्रवास; गडावर येणार्‍या विशाल शिळेची सर्वत्र चर्चा | पुढारी

शिळेचा देगलूर ते भगवानगड प्रवास; गडावर येणार्‍या विशाल शिळेची सर्वत्र चर्चा

कृष्णनाथ अंदुरे

खरवंडी कासार : संत भगवानबाबांची अपार निष्ठा संत ज्ञानेश्वर व ग्रंथ ज्ञानेश्वरीवर होती. आपल्या गळ्यात देखील माऊलींची सुवर्ण समाधी शेवटच्या श्वासापर्यंत ठेवली होती. त्यांनी गडाची स्थापना करून वारकरी पंथाची भगवी पताका फडकवत धर्म आणि समाज कार्याचा आदर्श घालून दिला होता. त्याच भगवान गडावर संत ज्ञानेश्वर यांचे भव्य दिव्य मंदिर उभारण्याची संकल्पना महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी पूर्णत्वास येत आहे. मंदिरासाठी लागणारी काळी कुळकुळीत अगडबंब शिळा देगलूर-नांदेड ते भगवानगड, असा प्रवास अचंबित करणार असून, अयोद्धेच्या राम मंदिरासाठी येत असलेल्या शिळेपाठोपाठ आता भगवान गडावर येणार्‍या विशाल शिळेची चर्चा सर्वदूर आहे.

संकल्पीत मंदिरासाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च येणार असून, भगवान गडाचे संस्थापक संत भगवानबाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीवर प्रेम केले. धर्म कार्य करताना समाजकार्यही केले. शिक्षणावर भर देत गरीबांच्या मुलासाठी वसतिगृह संकल्पना सुरू केली. त्यातून हजारो विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी झाले, अंधश्रद्धा, पशुहत्या बंदी, व्यसनमुक्ती सारखे काम करून क्रांती करत गडाची धर्म पताका फडकवत ठेवली. तीच परंपरा पुढे त्यांचे उत्तराधिकारी भिमसी महाराज यांनी जोपासली.

आता, महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी गडाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत गडाचा सर्वांगिण विकास करताना, अध्यात्मिक क्षेत्रातही क्रांती केली. ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या माध्यमातून शास्त्री पदवीप्राप्त साधक घडवण्याचे काम सुरू ठेवले. महंत शास्त्री यांची संत ज्ञानेश्वरांचे भव्य दिव्य पाषाणाचे मंदिर उभारावे ही संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लागणारा काळा पाषाण थेट देगलूर नांदेड हून मागविला आहे. सुमारे 25 कोटींचे संकल्पीत मंदिर उभारणीसाठी या दगडांचा प्रवास सुरू झाला असून, अगडबंब दगड पाहून अनेकांना अचंबित करत आहे.

एका दगडाचे वजन सुमारे 25 टन
दोन दिवसांपूर्वी आलेल्या एका दगडाचे वजन सुमारे 25 टन असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण मंदिरासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा खर्च दगडावर होणार असून, त्याला नक्षीदार आकार देणे, मंदिर उभारणीचे काम पहाता मंदिर भव्यदिव्य असणार आहे. बाबांच्या समाधी दर्शनाबरोबरच विठ्ठलाचे आणि ज्ञानेश्वरांचे दर्शन होणार असून, गडावर आळंदी व पंढरपूरचा आनंद मिळणार आहे.

विकासकामांमुळे देणगीचा ओघ
भगवान गड संस्थानच्या पैठण, पंढरपूर, आळंदी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देव दर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी आद्ययावत भक्तनिवस आहे. भगवान गडावरही विनामूल्य अन्नछत्र सुरू आहे. भगवान गडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात वारकरी सप्रंदयाचे विनामूल्य शिक्षण दिले जाते. भगवान गडावर गर्दीचा ओघ वाढत असून, देणगी देणार्‍यांची संख्याही वाढली आहे. विविध जिल्ह्याच्या विविध गावचे ग्रामस्थ भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्रींना आमंत्रित करून देणगी देत आहेत.

Back to top button