नगर तालुका : शेतकर्‍यांच्या गळ्यात सावकारकीचा फास! वसुलीसाठी खास पंटर | पुढारी

नगर तालुका : शेतकर्‍यांच्या गळ्यात सावकारकीचा फास! वसुलीसाठी खास पंटर

शशिकांत पवार

नगर तालुका : नगर तालुक्यात काही वर्षांपासून अवैध सावकारकीचा ‘काळा धंदा’ मोठा तेजीत असून, शेतकर्‍यांच्या गळ्यातील सावकारकीचा फास दिवसेंदिवस आवळत चालल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अवैध सावकारकी तेजीत सुरू असली तरी सावकारांच्या दंडेलशाहीमुळे शेतकरी, कर्जदार त्यांच्या विरोधात तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अवैध सावकारांचे फावत असून, दरमहा दरशेकडा पाच ते वीस टक्के दराने पैसे देण्यात येतात. अव्वाच्या सव्वा व्याज लावून सावकारकी सुरू आहे.

ग्रामीण भागात सावकारकीचा सर्वाधिक फास शेतकरी व शेतमजूर कुटुंबाभोवती आवळला जात आहे. राष्ट्रयीकृत बँकांकडून, तसेच पतसंस्थांकडून शेतकर्‍यांच्या कर्जासाठी होणारी पिळवणूक व विलंबामुळे शेतकरी अवैध सावकाराचे उंबरे झिजवतो. परवानाधारक सावकारांना कर्ज देताना शासनाने दर निश्चित करून दिले आहेत. परंतु, अवैध सावकारकीचा गोरख धंदा करणार्‍या सावकारांचे दर शेतकर्‍यांना परवडत नाहीत.

शेतीमालास भाव नसणे, नैसर्गिक संकट, पिकांचे होणारे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, पीक खर्च, शिक्षण, विवाह, आजारपणासाठी खासगी सावकारांशिवाय शेतकर्‍यांना पर्याय दिसत नाही. याच कारणाने शेतकरी, शेतमजूर सावकारांच्या विळख्यात अडकत असतो. खाजगी सावकारकी, करणार्‍यांची गाव तसेच परिसरामध्ये चांगलीच दहशत असते.

वसुलीसाठी खास ‘पंटर’
नगर तालुक्यात अवैध सावकारकीचा व्यवसाय करणार्‍यांनी वसुलीसाठी खास ‘पंटर’ नियुक्त केले आहेत. त्यांना दरमहा पगार दिला जातो. पंटर कर्जदाराच्या दारात जाऊन दहशत, दमदाटी, मारहाण, शिवीगाळ, वाहन व इतर वस्तू जप्त करून आणण्याचे काम करतात. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पंटरांच्या दहशतीमुळे शेतकरी तक्रार देण्यास धजावत नाहीत. त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे.

दहशतीमुळे विरोधात तक्रार नाही
सावकारांच्या दहशतीमुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल होत नाहीत. सावकार वसुलीसाठी शेतजमीन, घर बळकवणे, महिलांचे शोषण, असे प्रकार घडत आहेत. जेऊर परिसरात तर खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. यातून जमिनी बळकाविण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु, सावकाराच्या दहशतीमुळे मात्र गुन्हे दाखल झालेले नाहीत. अवैध सावकारकीच्या व्यवसायात उच्चशिक्षित, प्रतिष्ठित नागरिक, शासकीय नोकरदार, मोठे व्यावसायिक पडलेले दिसून येतात. अनेकांचे संसार बरबाद होत आहेत. खासगी सावकार कोरे धनादेश, कोरे मुद्रांक, तसेच जमिनीचे साठेखत, खरेदीखत करून घेतात.

सावकारांची दहशत, दडपशाहीमुळे शेतकरी तक्रार करत नाहीत. परंतु, शेतकर्‍यांनी न घाबरता समोर यावे. सावकारांविरोधात महाराष्ट्र सावकारकी अधिनियम 2014 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल. तसेच, तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येईल. त्यामुळे शेतकर्‍यांनी पुढे यावे.
                                  – युवराज आठरे, सहायक पोलिस निरीक्षक

Back to top button