कर्जत : शेतकरी पंचनामाच्या प्रतीक्षेतच; नुकसान होऊन आठ दिवस झाले | पुढारी

कर्जत : शेतकरी पंचनामाच्या प्रतीक्षेतच; नुकसान होऊन आठ दिवस झाले

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले, मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकर्‍यांकडे फिरकले देखील नाही, असे चित्र कर्जत तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैराश्याची वातावरण पसरले आहे. कर्जत तालुक्यामध्ये मागील आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस पडला. यावेळी कर्जत परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते.

कर्जत कोरेगाव रोडवरील कर्जत शहराच्या हद्दीमध्ये असणारे शेतकरी अंबादास कदम यांचे शेत शहरापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. तरीदेखील अधिकारी अद्यापि त्यांच्या शेतामध्ये आलेले नाहीत. महसूल विभागाची व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी पंचनामे करण्यासाठी संबंधित शेतकर्‍याच्या बांधावर जाणे अपेक्षित होते. मात्र दुर्दैवाने अजूनही ते फिरकले नाहीत.

शेतकरी अंबादास कदम हे अनेक वेळा तलाठी कार्यालयामध्ये देखील जाऊन आले. परंतु त्यांची दखल घेण्यासाठी कर्मचार्‍यांकडे वेळ नाही असे विदारक चित्र कर्जतमध्ये पहावयास मिळत आहे. जर अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई देत नसतील, तसेच पंचनामेही होत नसतील तर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई कशी मिळणार, असा गंभीर प्रश्न कर्जत तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे. यामुळे कर्जत-जामखेड मतदार संघातील आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, याप्रश्नी महसूल व कृषी विभाग आतातरी पंचनामे करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

Back to top button