टाकळीभान : चोरट्यांकडून पोलिसांचा तिसरा डोळा ‘टार्गेट’

टाकळीभान; पुढारी वृत्तसेवा : सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे पोलिसांकडून अनेक गुन्ह्यांची उकल होत असल्याचे सर्वश्रुत आहे. परंतु पोलिसांचा तिसरा डोळा समजले जाणार्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे चोरी करण्यात आली आहे. सदरचे चोरटे कॅमेर्यात कैद झालेले असले तरी पोलिसांना त्यांनी दिलेले हे मोठे आव्हान आहे.
टाकळीभान येेथे अज्ञात चोरट्यांनी दुकाना समोर लावलेले अंदाजे 25 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेलेले आहेत. दिनांक 4 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी टाकळीभान येथील सावता टी हाऊस समोर लावलेले चार कॅमेरे, हॉटेल सावता समोरील एक कॅमेरा, अथर्व मेडिकल समोरील एक कॅमेरा, शेतकी कृषी सेवा केंद्रासमोरील एक कॅमेरा व एटीएम समोरील एक कॅमेरा अंदाजे किंमत 20 ते 25 हजार रुपये किमतीचे असे आठ कॅमेरे चोरून नेले आहेत. सीसीटीव्ही फुटेज मध्ये एका चोरट्याचे छायाचित्र कैद झालेले आहे.
टाकळीभान येथील सर्व दुकानदारांनी दुकानात होत असलेल्या चोर्या रोखण्यासाठी दुकानात व दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहे. दि. 4 फेब्रुवारीच्या रात्री पोलिस दूरक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी श्रीरामपूर- नेवासा या रस्त्यावर असलेल्या विविध दुकाना समोरील सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.
सकाळी दुकान उघडल्यावर कॅमेरे चोरी गेल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. याबाबत पोलिस स्टेशनला कॅमेरे चोरीची तक्रार करणार असल्याचे दुकानदारांनी सांगितले. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांची मोठी मदत मिळत असते. सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे पोलिसांनी मोठाल्या गुन्ह्यांची उकल केलेली असल्याचे सर्वश्रुत आहे. पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने प्रत्येकावर लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य नसल्याने पोलिस सीसीटीव्ही मदत घेतात.
श्रीरामपूर येथील पोलिसांनी प्रशासनाला शहर परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यात काही अंशी यश मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात सीसीटीव्ही बसविल्याने विविध गुन्ह्यांचे प्रमाण वर्षाअखेर घटले आहे. शहर पोलिस ठाण्यात गतवर्षात दाखल गुन्ह्यांपैकी अनेक गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
गावांमधील चोर्यांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी येथील व्यापार्यांमध्ये जनजागृती केली. व्यापारी, दुकानदार यांनी त्यांच्या आवाहानाला साद देत तसेच आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. परंतु याच सीसीटीव्ही कॅमेर्यांची चोरी चोट्यांनी केलेली आहे. त्यामुळे पोलिसही बुचकळ्यात पडलेले आहे. या कॅमेर्यांची चोरी म्हणजे भविष्यातील मोठ्या घटनेची नांदी तर नाही ना? असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे.