श्रीगोंदा : भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; खा. सुजय विखे यांच्या समोरच गोंधळ | पुढारी

श्रीगोंदा : भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; खा. सुजय विखे यांच्या समोरच गोंधळ

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे खासदार डॉ.सुजय विखे यांच्या कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने मोठा गोंधळ झाला. दरम्यान, खासदार विखे यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खासदारांच्या समोरच हा गोंधळ झाल्याने या घटनेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

लोणी व्यकंनाथ येथील एका कार्यक्रमासाठी खासदार विखे आले होते. त्यांच्यासमवेत आमदार बबनराव पाचपुते, अ‍ॅड.गणपतराव काकडे, भगवानराव पाचपुते आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते व राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी विखे यांचे कामांबाबत कौतुक करून अभिनंदन केले. त्यानंतर अ‍ॅड. काकडे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढले. यावर स्वस्थ बसतील ते नाहटा कसले. नाहाटा यांनी माईक हातात घेत अ‍ॅड. काकडे यांच्यावर निशाणा साधला. समोरून काकडे यांनीही प्रत्युत्तर दिल्याने कार्यक्रमादरम्यान चांगलेच

शाब्दिक युद्ध सुरू झाले. त्यानंतर कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी खासदार विखे यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला. विकासाचा प्रश्न आहेत. कार्यकर्त्यांना मने मोकळे होण्याची जागा नसल्याने अशा ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळते.

सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असती तर, सगळे म्यूट म्हणजे मूक दिसले असते. थोडे दिवस थांबा. जिल्हा परिषद निवडणुका होऊ द्या, सगळे ठिक होईल, श्रीगोंद्यातही तेच दिसणार आहे, असे सूचक वक्तव्य खासदार विखे यांनी केले. कार्यक्रमानंतर खासदार सुजय विखे यांनी केलेल्या या सूचक वक्तव्याची कार्यकत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती.

अंतर्गत धुसफुसीचा परिणाम
बाळासाहेब नाहटा हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असले तरी, खासदार विखे तालुक्यात आले की, ते बहुतांश वेळा त्यांच्या समवेत असतात. अन् हिच बाब कार्यकर्त्यांना खटकते. या गोष्टीचा उहापोह झाल्यानेच हे शाब्दिक युद्ध रंगले.

सोशल मीडियावर चर्चा
लोणी येथील कार्यक्रमादरम्यान दोन गटांत शाब्दिक युद्ध झाल्याची घटना घडल्यानंतर फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवर याची चांगलीच चर्चा रंगली होती. या वादाला तालुक्याबाहेरील यंत्रणाच कारणीभूत असल्याच्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या.

Back to top button