संगमनेर : वडिलांचे नेटवर्क, विखेंच्या बॅकिंगने ‘सत्य-जित’

संगमनेर : वडिलांचे नेटवर्क, विखेंच्या बॅकिंगने ‘सत्य-जित’

गोरक्ष नेहे

संगमनेर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या, चुरशीच्या झालेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा दारुण पराभव करीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले. यांना मताधिक्क्य मिळण्यामागे खर्‍या अर्थाने वडील आ. डॉ. सुधीर तांबे यांनी पदवीधर मतदार संघाची व्यवस्थित केलेली बांधणी अन् गेल्या 13 ते 14 वर्षांपासून मतदार संघात प्रत्येक घटकापर्यंत जपलेला ऋणानुबंध, स्नेह, सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पाचही जिल्ह्यात असलेले नेटवर्क व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी दिलेल्या बॅकिंगमुळे सत्यजित तांबे प्रचंड मतांनी विजयी झाल्याचे दिसते.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या मतदार संघाचे पुन्हा एकदा नेतृत्व आ. डॉ. सुधीर तांबे हेच करतील, अशी सर्वांनाच आशा होती, परंतु अचानक राजकीय गणितं बदलले आणि डॉ. तांबे बाजूला होऊन पुत्र सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

यानंतर पक्षाचा एबी फॉर्म असतानाही डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची अधिकृतरित्या उमेदवारी न घेता पुत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी करु दिली. ही बाब काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना रुचली नाही. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत सत्यजित तांबे यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांनी एक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तर एक अपक्ष उमेदवार असे दोन अर्ज भरले, मात्र पक्षाने एबी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत न दिल्यामुळे ते शेवटी अपक्षच राहिले अन् आणि आपण भाजपसह इतर पक्षांचाही पाठिंबा घेणार असल्याचे जाहीर करून जणू काँग्रेसलाच आव्हान दिले.

सत्यजित तांबे यांनी जाहीर केलेली भूमिका काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना चांगलीच खटकली. सर्वप्रथम माजी आ. डॉ. सुधीर तांबे व त्यांच्या पाठोपाठ पुत्र अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित केले.
तांबे पिता-पुत्राच्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या हक्काची जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर आली, मात्र तांबे अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांना सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहेत, मात्र ते आता भाजपमध्ये जातात की, पुन्हा काँग्रेसमध्ये राहतात, की अपक्षच राहतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्यजित तांबे यांनी निवडणूक लढविताना शिक्षक, युवक व बेरोजगार यांच्या समस्यांना हात घातला. निवडून आल्यानंतर आपण सर्वप्रथम अनेक दिवसांपासून प्रलंबित पडलेल्या जुनी पेन्शन योजना, शासकीय भरती, कला, क्रिडा, कार्यानुभव विषयाच्या अंशकालिन शिक्षकांना कायम करणे आदी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

याच जोरावर पदवीधर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत तांबे यांना निवडून आणले. त्यामुळे आता तांबे यांच्यापुढे निवडणुकीमध्ये मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. या मतदार संघातील माजी आ. डॉ. सुधीर तांबे तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी निवडणुकीत ज्यांच्या जिवावर रणशिंग फुकले त्या भाजपने अखेरपर्यंत पाठिंब्याबद्दलचे सस्पेन्स कायम ठेवले. यासर्व घडामोडीबाबत शुभांगी पाटील यांनी पाचही जिल्ह्यांमध्ये प्रचाराचा जोरदार धडाका लावला होता.

त्यामुळेच काही काळ तांबे यांच्या गोटात चिंता निर्माण झाली होती मात्र, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तांबे यांनी आक्रमक व्यूहरचना आखत बाजी मारली. तांबे यांनी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद भूषविताना निर्माण केलेली युवकांची फळी आणि विविध संघटनांनी दिलेला पाठिंबा, यामुळे तांबे यांचा विजय सोपा झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

सत्यजित तांबे यांनी जरी ही निव डणूक अपक्ष लढवली असली भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पा. यांची सर्व यंत्रणा शेवटच्या दोन दिवस अगोदर तांबे यांच्या मदतीसाठी कामाला लावली. संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक भाजप नेत्यांनी उघड- उघड नाही तर छुपी मदत तांबे यांना केली.

अनेक नेते विविध राजकीय पक्षांचे असले तरी तांबे- थोरात परिवाराशी अनेकांचे कौटुंबिक नाते आहे. या नात्या-गोत्यांचा त्यांना उघड पाठिंबा नसला तरी छुप्या पद्धतीने तांबे यांना मदत झाल्याचे नाकारून चालणार नाही. तांबे यांच्या मागे जरी कुठलाही राजकीय पक्ष नसला तरी त्यांचे सर्व राजकीय पक्षातील नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा मताधिक्क्य वाढविण्यात झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत असल्याचे बोलले जात आहे.

तीनही पक्षांमध्ये एकमत नसल्याचे चित्र
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये एकमत नसल्याचे चित्र पहायला मिळाले. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये दोन गट पडले. राष्ट्रवादी पहिल्यापासून काहीशी नामानिराळा राहिला. या बाबीचा सत्यजित तांबे यांनी फायदा उचलत विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी झाले.

कला, क्रिडा, कार्यानुभव शिक्षकांना मोठी आस
कला, क्रिडा, कार्यानुभव विषयाच्या अंशकालिन शिक्षकांच्या कायम नियुक्तीचे भीजत घोंगडे कायम आहे. 2009 सालापासून 11 महिन्यांच्या आदेशावर, तुटपुंज्या मानधनावर सेवा केलेल्या या महत्वाच्या विषयांच्या शिक्षकांकडे राज्य शासनाने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे. कायम सेवेबाबत न्यायालयाच्या निकालानंतरही बघु, करु अशीच भूमिका असल्याने शिक्षकांसह जि. प. शाळेतील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याकडे आ. सत्यजित तांबे यांनी लक्ष घालावे, असे बोलले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news