कोळपेवाडी : वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगाव स्टेशनला थांबा द्या | पुढारी

कोळपेवाडी : वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगाव स्टेशनला थांबा द्या

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली. या वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनला थांबा द्यावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आ. काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते शिर्डी 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

मुंबई, शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नाशिक, ठाणे या मार्गे ही वंदे भारत एक्स्प्रेस जाणार आहे. या एक्स्प्रेसला मनमाड, नाशिक, ठाणे येथे अधिकृत थांबा आहे. कोपरगाव तालुक्यातील असंख्य नागरिक नेहमी कामानिमित्त मुंबईला जातात, मात्र मुंबईला जाण्यास कोपरगाव येथून आठवड्यातून केवळ एक एक्स्प्रेस रेल्वे आहे. तिची वेळ देखील रात्रीची आहे.

कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना मुबईला जायचे असल्यास मनमाडला जावे लागते. अनेक वर्षांपासून मुंबईसाठी नवी एक्सप्रेस सुरु करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांची आहे. सुरु होणार्‍या वंदे भारतची बैठक व्यवस्था फक्त बसून जाण्यास केली आहे. कोपरगावी रेल्वे थांबल्यास रेल्वे स्थानकाचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रवाशांची मुंबईसाठी नवीन एक्सप्रेस सुरु करावी, ही नेहमी होणारी मागणी यानिमित्त पूर्ण होणार आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याने रेल्वे प्रवाशी सुखावले आहेत.

Back to top button