करंजी : केंद्राकडून जिल्ह्याला दीड हजार कोटी : खा. डॉ.सुजय विखे

करंजी : केंद्राकडून जिल्ह्याला दीड हजार कोटी : खा. डॉ.सुजय विखे

करंजी; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने दीड हजार कोटींचा निधी दिला आहे. नगर-पाथर्डी रस्त्याच्या कामाचे काहींनी राजकारण केले. मात्र, मी खासदार नसतो तर या रस्त्याचे काम कोणाच्या बापाच्यानेही पूर्ण होऊ शकले नसते, अशी अवस्था या रस्त्याची झालेली होती. प्रामाणिक प्रयत्न, पाठपुरावा, तसेच प्रत्येक अडचणीवर मात करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. लवकरच हा रस्ता प्रवाशांसाठी सुखकर ठरेल, असा विश्वास खासदार डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मिरी-तिसगाव प्रादेशिक योजनेच्या माध्यमातून 43 गावांना पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. यासाठी सुमारे 155 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच, चिचोंडी येथील दीड कोटी रूपयांच्या ग्रामपंचायतच्या कामाचे भूमिपूजन खासदार विखे यांच्या हस्ते व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते.

खासदार विखे म्हणाले, माजी मंत्री कर्डिले यांच्या कार्यकाळात या मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. विरोधक मात्र कर्डिलेंनी मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन करत आहेत. कोल्हारघाट रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्याची या भागातील जनतेची मागणी आहे. घाटाचे रुंदीकरण झाल्याशिवाय या घाटातून प्रवास करणार नाही. केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे. विकासकामांसाठी जिल्ह्यात कुठे किती निधी द्यायचा, याचे संपूर्ण नियोजन माझ्यासह कर्डिले यांच्याकडे आहे, असेही खासदार विखे म्हणाले.

कर्डिले म्हणाले, मागील तीन वर्षांत किती विकास केला याचा हिशेब विद्यमान आमदाराने द्यावा. मी 2014 ते 2019 या पाच वर्षांत किती विकास केला याचा हिशेब द्यायला तयार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात बाराही ठिकाणी भाजपचेच आमदार विजयी होतील. सत्यजित तांबे यांचा विजय भाजपमुळे झाला आहे. वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला देखील लवकरच मंजुरी देऊन या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सोडविला जाणार आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, अभय आव्हाड, राहुल राजळे, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, प्रतीक खेडकर, अजय रक्ताटे, गोकुळ दौंड, भीमराव फुंदे, रामकिसन काकडे, मिर्झा मणियार, बाळासाहेब अकोलकर, सचिन वायकर, चारुदत्त वाघ, संतोष शिंदे, डॉ. नंदकिशोर नरसाळे, चेअरमन बाळासाहेब लवांडे, पुरुषोत्तम आठरे, बंडू पाठक, अनिल गिते, सुनील परदेशी, शिवाजीराव पालवे, श्रीकांत आटकर, राजेंद्र तागड, साहेबराव गवळी, संजय नवल, सुनील मतकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एकनाथ आटकर यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. आभार वैभव खलाटे यांनी मानले.त्यांनी किती निधी दिला?

'त्यांनी' किती निधी दिला?
मागील अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी वीज बिलावरून अनेक वेळा पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या. आताचे विरोधी पक्षनेते त्यावेळी राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांनी या नळ योजनांसाठी व वीजबिल भरण्यासाठी किती निधी उपलब्ध करून दिला? असा सवाल त्यांनी केला.

कार्यकर्त्यांची सोयीनुसार भूमिका नको
कार्यकर्ते कामे घेऊन खासदार विखे, आमदार मोनिका राजळे किंवा माझ्याकडे येतात. मात्र, ते विरोधकांकडेही जातात. असा दुटप्पीपणा योग्य नाही. यापुढे भाजपबरोबर एकनिष्ठ राहणार्‍या कार्यकर्त्यांसाठीच आमचे दरवाजे उघडे असतील, याचा विचार करा, अशा शब्दात कर्डिले यांनी सोयीनुसार राजकारण करणार्‍या कार्यकर्त्यांना सुनावले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news