नगर : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; चार लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नगर : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर; पुढारी वृत्तसेवा : घरगुती गॅसटाकीतून रिक्षामध्ये गॅस भरणार्‍या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर शनिवारी (दि.4) शहर विभागाचे उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी छापा टाकला. पाईपलाईन रोडवर अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाल्यांनतर पथकाने दोघांना ताब्यात घेत, तीन लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सनी दत्ता शिंदे (रा.वैदूवाडी), युसूफ नजीर पठाण (रा.भातोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पथकाने पाईपलाईन रोडवरील बारस्कर मळ्याजवळ छापा टाकला असता, आरोपी सनी शिंदे हा बेकायदेशीररित्या घरगुती गॅस टाकीतून रिक्षामध्ये गॅस भरताना आढळून आला. पोलिसांनी शिंदे याच्यासह गॅस भरणार्‍या रिक्षाचालकाला ताब्यात घेत, गॅस टाक्या व गॅस रिफिलिंग मशीन, वजन काटा व इतर साहित्य जप्त केले.

30 हजार रुपये किमतीची गॅस रिफिलिंग मशीन, दोन मोटार, 20 हजार रूपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दोन लाख 20 हजार रूपये किमतीची रिक्षा, 17 हजार 500 रूपये किमतीच्या सात सील नसलेल्या टाक्या व एक लाख 8 हजार 500 रूपये किमतीच्या 31 सीलबंद गॅस टाक्या, असा 3 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. उपअधीक्षक कातकाडे यांच्या पथकातील हवालदार शेख तनवीर, हेमंत खंडागळे, सुयोग सुपेकर, सागर द्वारके यांनी ही कारवाई केली. पुढील तपास हवालदार संभाजी बडे करीत आहेत.

तोफखाना डीबीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
डीवायएसपी कातकडे यांनी गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई केल्याने तोफखाना पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून पाईपलाईन रोडवर अवैधरित्या गॅस रिफिलिंग होत असताना, तोफखाना पोलिस ठाण्यातील डीबीने कारवाई का केली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button