नगर: पडवीवरील सिमेंटची वरांडी पडून चुलता पुतणी जागीच ठार, वेल्हाळे येथील दुर्दैवी घटना | पुढारी

नगर: पडवीवरील सिमेंटची वरांडी पडून चुलता पुतणी जागीच ठार, वेल्हाळे येथील दुर्दैवी घटना

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: पत्र्याच्या घराच्या भिंतीवरील सिमेंटची वरांडी अचानकपणे पडून त्या खाली दबल्या गेलेल्या चुलता पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, एका महिलेचा पाय फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वेल्हाळे गावामध्ये घडली आहे. लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय 45) सारिका एकनाथ सोनवणे (वय 5) दोघेही राहणार वेल्हाळे तालुका, संगमनेर असे मृत झालेल्या चुलता पुतणीचे नावे आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात लक्ष्मण व एकनाथ सोनवणे हे दोघे भाऊ राहत आहेत. बाहेर पडवीत भाऊ आणि लहान मुलं जेवणासाठी बसले होते. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानकपणे त्या पडवीवरील सिमेंटची वरांडी घराच्या पडवीमध्ये जेवत असलेल्या लक्ष्मण सोनवणे व त्यांची पुतणी सारिका यांच्या डोक्यात जोरात पडली. स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. त्यांच्याजवळच जेवत असणारे इतर जण थोडक्यात बचावले. या घटनेत मयत लक्ष्मणची सावत्र आई वैजंताबाई चंद्रभान सोनवणे यांचा पाय फ्रॅक्चरझाला असून त्या जखमी झालेल्या आहेत

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. अनेकांनी सोनवणे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आणि जखमींना तात्काळ मेडिकेवर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच लक्ष्मण सोनवणे व सारिका सोनवणे या चुलता पुतणीचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दोन्ही मृतदेहाचे नगरपालिकेच्या कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात वेल्हाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत लक्ष्मण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, आणि दोन मुले असा परिवार आहे.

Back to top button