राहुरी : गुंजाळेत कुंटणखान्यावर छापा; तीन परप्रांतीय महिलांची सुटका | पुढारी

राहुरी : गुंजाळेत कुंटणखान्यावर छापा; तीन परप्रांतीय महिलांची सुटका

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरीसह सोनई येथील पोलिस पथकाने संयुक्त कारवाई करून राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील गुंजाळे येथे मध्यरात्री वेश्या व्यवसायावर छापा टाकला. या ठिकाणाहून तीन परप्रांतीय महिलांची सुटका करून एकास ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त खबर्‍यामार्फत वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली होती.

त्यांच्या आदेशानुसार राहुरी व सोनई येथील पोलिस पथकाने राहुरी तालुक्यात वांबोरी ते पांढरी पूल रोडवर गुंजाळे गावाच्या परिसरात एका शेतात (दि. 3) फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजे दरम्यान छापा टाकला. यावेळी पथकाने एका इसमाला बनावट ग्राहक बनवून पाठविले. वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली.

पोलिस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून 3 परप्रांतीय महिलांची वेश्या व्यसायातून सुटका केली. वेश्या व्यवसाय चालविणारा रवी ऊर्फ संजय गायकवाड याला ताब्यात घेऊन गजाआड केले. ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत बर्‍हाटे, हवालदार वाल्मिक पारधी, सचिन ताजने, नदिम शेख, रमेश शिंदे, महिला पोलिस नाईक राधिका कोहकडे तसेच सोनई पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक फौजदार बाळासाहेब अकोलकर, हवालदार प्रविण आव्हाड, सचिन ठोंबरे, ज्ञानेश्वर आघाव, अमोल जवरे यांच्या पथकाने यशस्वी केली.

पोलिस नाईक रमेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवी ऊर्फ संजय राजू गायकवाड (रा. गुंजाळे, ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 122/2023 स्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे वेश्या व्यवसाय चालविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Back to top button