राहुरी : शाळेस तब्बल 1.22 लाखाचा लोकसहभागातुन निधी जमा | पुढारी

राहुरी : शाळेस तब्बल 1.22 लाखाचा लोकसहभागातुन निधी जमा

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : नुतन मराठी शाळा नंबर 10, सरोदेवस्ती, राहुरी ही नगरपालिका केंद्रातील अग्रगण्य उपक्रमशील शाळा मानली जाते. या शाळेच्या शिक्षिकांनी कोरोना संकटानंतर जून 2022 पासून नियमित शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या भौतिक सुविधा सुधारण्यास हालचाली सुरू केल्या. त्यांना अनेक प्रकारचे अडथळेही आले, पण त्यावर मात करीत या चालू शैक्षणिक वर्षात या महिला त्रिमूर्तीने शाळेच्या भौतिक सुविधांसाठी तब्बल 1.22 लाखाचा लोकसहभाग निधी जमा करून शाळेचे रुपडे पालटले.

दिपाली पतंगे व रेवती एळवंडे या शिक्षिका कार्यरत आहेत. त्यांना बालवाडी शिक्षिका अर्चना रेलकर मदत करतात. विविध गुणवत्ता पूरक उपक्रम या शाळेत वेळोवेळी राबवले जातात. नगरपालिका केंद्रातील ही अशी पहिलीच शाळा असेल की जेथे फक्त महिला शिक्षिका असुनही एव्हढ्या मोठ्या प्रमाणात शाळेस लोकसहभाग निधी त्यांनी जमविला.

जमा झालेल्या निधीतून शालेय रंगकाम, बेंच, मुलांसाठी घसरगुंडी, झोका, सीसॉ, बालवाडी शेड आदी कामे केली. विशेष म्हणजे शाळा परिसरात काही दानशूर व्यक्तींसोबत बाहेरगावच्या लोकांनीसुद्धा या शाळेशी काडीमात्र संबंध नसताना केवळ शाळेत चालणारे उपक्रम पाहून प्रभावित होऊन शाळेस देणगी दिली, असे मुख्याध्यापिका पतंगे यांनी सांगितले.

शाळेचे बदललेले रूप पाहून शाळा परिसरातील पालक, ग्रामस्थ राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शिक्षिकांचे कौतुक केले आहे. देणगीदारांशिवाय हे काम अशक्य होते, म्हणून सर्वांनी त्या देणगीदारांचे आभार मानले. येत्या काळात ही वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांचा गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे पतंगे, एळवंडे व रेलकर या शिक्षिकांनी सांगितले.

Back to top button