अतिक्रमण करण्यासाठी कडुनिंबाचे झाड तोडले; पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

अतिक्रमण करण्यासाठी कडुनिंबाचे झाड तोडले; पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी झाड तोडल्याप्रकरणी पाथर्डी नगरपरिषदेने अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शहरातील शेवगाव-पाथर्डी रस्त्यालगत नवीन बसस्थानकाच्या मुख्य प्रवेश द्वारावर कडुलिंबाचे झाड आहे. त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने झाड तोडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी अशा अतिक्रमण खोरांकडून सर्रास वृक्षाची तोड केली जाते. शहरात मोकळी जागा दिसेल तिथे अतिक्रमण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात अतिक्रमणाचा धडाकाच सुरू आहे. अतिक्रमणामुळे शहराचे विद्रूपीकरण होऊन वाहतुकीलाही मोठा अडथळा होत आहे.

वेळीच अतिक्रमण होण्यापासून रोखल्यास अतिक्रमणाला मोठा आळा बसेल. मात्र, प्रशासन बेजबाबदारीने वागत असल्यामुळेच आम्ही काहीही करू शकतो आणि कुठेही अतिक्रमण केल्याने आमचे काहीच होत नाही, अशीच धारणा अतिक्रमणधारकांचे झाली मुख्याधिकार्‍यांच्या आदेशाने शुभम काळे, नगर रचनाकार गौरव आदिक यांनी घटनास्थळी पाहणी केली.

त्यावेळी त्या ठिकाणी अंदाजे आठ वर्ष वयाचे एक कडुलिंबाचे झाड तोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पंचासमक्ष पंचनामा करून पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिव्विरुद्ध शुभम काळे यांच्या तक्रारीवरून कडूलिंबाचे झाड तोडल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Back to top button