कौतुकास्पद! केंद्रीय गृहमंत्री पदकावर गणेश देशमुखांनी कोरले नाव | पुढारी

कौतुकास्पद! केंद्रीय गृहमंत्री पदकावर गणेश देशमुखांनी कोरले नाव

ढोरजळगाव; पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनी देशाच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ष्ट कामगिरी बजावणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातून नगर जिल्ह्यातील ढोरजळगाव (ता.शेवगाव) येथील पोलिस कर्मचारी गणेश देशमुख यांचा समावेश आहे.

देशमुख हे सध्या पोलिस प्रशिक्षण केंद्र मरोळ, मुंबई येथे पोलिस सेवेत कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी पोलिस दलामध्ये नोकरी मिळविली. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी गुणवत्तापूर्वक कामगिरीचे दर्शन घडवित जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ढोरजळगाव येथील सर्वसामान्य पोलिस कर्मचार्‍याच्या कुटुंबात जन्मलेल्या गणेश यांचे वयाच्या सहाव्या वर्षीच पितृछत्र हरपले. अकाली अंगावर जबाबदारी आल्याने बालपणीच मजुरीची कामे त्यांना करावी लागली. बी. ए.ला असताना राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून 26 जानेवारी 1999 रोजी दिल्ली येथे झालेल्या राजपथावरील संचलनात सहभाग नोंदवित उत्कृष्ट कामगिरी केली.

ठाणे ग्रामीण पोलिस कार्यालय, डहाणू, उपअधीक्षक कार्यालयात त्यांनी सेवा बजावली आहे. पोलिस विभागातील सेवा प्रवेशोत्तर परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मार्गदर्शिका पुस्तक तयार करण्यात महत्त्वाचा सहभाग त्यांनी नोंदविला. याबद्दल तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आले. 140 च्यावर बक्षीस संख्या, पूर्वसेवेत केलेली उत्कृष्ट कामगिरी व प्रशिक्षण केंद्रामध्ये केलेल्या कामगिरीचा विचार करून देशमुख यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले.

Back to top button