नाशिक पदवीधर मतदार संघ : चौदा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

नाशिक पदवीधर मतदार संघ : चौदा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

नगर; पुढारी वृत्तसेवा : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातील 14 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांना 59.16 टक्के तर शुभांगी पाटील यांना 33.90 टक्के तर वंचित बहुजन पार्टीचे रतन बनसोडे यांना 2.26 टक्के मतदान मिळाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची 7 फेब्रुवारी 2023 मुदत संपणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने 30 जानेवारीला निवडणूक घेतली. अ

हमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांत विभागालेल्या या मतदारसंघासाठी एकूण 2 लाख 62 हजार 678 मतदारसंख्या असून, 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 1 लाख 16 हजार 618 वैध झाले. विजयी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी वैध मतदानाच्या 59.16 टक्के इतके मतदान घेतले.

महाविकास आघाडीने पाठींबा दिलेल्या शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. त्यांनी 33.90 टक्के मते घेत दुसरे स्थान पटकाविले. त्यानंतर बनसोडे यांना 2.26 व अविनाश माळी यांना 1.58 टक्के मतदान झाले. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहा हजार तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली.

एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश मते घेणार्‍या उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळते. त्यापेक्षा कमी मते घेणार्‍याची मात्र, अनामत रक्कम जप्त होते. त्यानुसार 3 हजार 240 पेक्षा कमी मते घेण्यार्‍या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे, अविनाश माळी, सुरेश पवार, अनिल तेजा, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, इरफान मो इसहाक, ईश्वर पाटील, बाळासाहेब घोरपडे, अ‍ॅड. जुबेर नासीर शेख, अ‍ॅड. सुभाष जंगले, नितीन सरोदे, पोपट बनकर, सुभाष चिंधे व संजय माळी या चौदा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

पदवीधर मतदारांनी तोडले अकलेचे तारे
मतदार पदवीधर असताना देखील पसंतीक्रम आकड्यात देण्याऐवजी अक्षरात दिला. काहींनी उमेदवारांच्या रकान्यात स्वाक्षरी करीत अकलेचे तारे तोडले. काही सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच काही शिक्षक मतदारांनी मतपत्रिकेवर 'जुनी पेन्शन सुरु करा' अशी ओळ लिहून मतदान बाद करण्याची कामगिरी केली. अशा विविध कारणांनी मतदारसंघातील 12 हजार 997 मते बाद झाली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news