करंजी : ग्रामपंचायत-भाजी विक्रेत्यांत खडाजंगी | पुढारी

करंजी : ग्रामपंचायत-भाजी विक्रेत्यांत खडाजंगी

करंजी; पुढारी वृत्तसेवा : तिसगाव ग्रामपंचायतीने बांधलेल्या ओट्यांवर बसण्यावरून गुरुवारी (दि.2) भाजी विक्रेते व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर काही भाजीविक्रेत्या महिलांनी थेट महामार्गावर बसूनच आंदोलन सुरू केल्याने तालुका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या तिसगाव येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारसाठी परिसरातील 25 ते 30 गावांतील लोक भाजी खरेदी-विक्रीसाठी येत असल्याने दर गुरुवारी मोठी गर्दी होते. अनेक विक्रेते महामार्गाच्या कडेलाच भाजी विक्रीसाठी बसतात. वाढत्या गर्दीमुळे बाजारासाठी ही जागा कमी पडते.

त्यामुळे ग्रामपंचायतीने सुमारे 25 लाख रुपये खर्च करून भाजी, भेळ विक्रेत्यांसाठी सुसज्ज ओटे बांधले आहेत. परंतु, अनेक भाजीविक्रेते, भेळविक्रेते या ओट्यावर बसायला टाळाटाळ करतात. बहुतांश सर्वच व्यावसायिक महामार्गालगत बसण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे या ठिकाणी दर आठवडे बाजारच्या दिवशी वाहतूक कोंडी होते.

अपघात घडू नये, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रत्येक विक्रेत्यानी ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागी बसावे, अशी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची भूमिका आहे. महामार्गावर आठवडे बाजार भरू नये, असे पत्रही जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामपंचायत, पाथर्डी पंचायत समितीला दिलेले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, एवढी एकच भूमिका यामागे असल्याचे सरपंच मुनिफा शेख, चेअरमन बाळासाहेब लवांडे यांनी सांगितले.

या अगोदर आम्हाला कोणीही बसण्यासाठी विरोध केला नाही. आमची गैरसोय केली नाही. मग आताच आमची अडवणूक का? असा सवाल भाजी विक्रेत्या सविता पाथरे, वर्षा ससाणे, मीरा शिंदे, ताराबाई गारुडकर, मनीषा अकोलकर, सविता काळे, लता पालवे, फिरोज पठाण, अर्षद शेख, दिलीप पाथरे यांनी केला. अर्ध्या तासाने पोलिस निरीक्षक कौशल्यनिरंजन वाघ, गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांनी घटनास्थळी येऊन ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्याचबरोबर आंदोलकांनाही महामार्गावरून बाजूला केले.

Back to top button