नगर :  स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त | पुढारी

नगर :  स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने ते सदस्य आज निवृत्त झाले. येत्या आठ दिवसांत महासभा होण्याची शक्यता असून, त्यात नवीन सदस्य समिती सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समिती सदस्यपदी आपली वर्णी लागावी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपच्या नगरसेवकांनी गटनेत्यासह पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थायी समिती हा महापालिकेचा आत्मा समजला जातो. त्यामुळे स्थायी समिती सदस्य होणे नगरसेवकांचे स्वप्न असते. स्थायीचे सदस्यत्व मिळाल्यानंतर प्रभागात मोठी कामे आणता येतात.

त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड होणे नगरसेवकांसाठी लकी समजले जाते. महापालिकेत स्थायी समितीसाठी 16 सदस्य आहेत. त्यातील आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने मंगळवारी (दि. 1) निवृत्त झाले. त्यामुळे आता नव्याने आठ सदस्यांना स्थायी सदस्यपदी संधी मिळणार आहे. सध्या पालिकेत राष्ट्रवादी पाच, भाजप चार, शिवसेना पाच, काँग्रेस एक, बसपा एक अशी सदस्य संख्या आहे. त्यातील राष्ट्रवादी दोन, भाजप दोन, शिवसेना तीन, बसपा एक असे सदस्य निवृत्त झाले. सर्वाधिक सदस्य शिवसेनेचे सदस्य निवृत्त झाल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थायी समिती सदस्यपदी नियुक्त होण्यासाठी गटनेते व पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. तर, राष्ट्रवादी, भाजपमध्येही सदस्यपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

आठ दिवसांत होणार महासभा
स्थायी समिती सदस्यांची निवड होण्यासाठी महापालिकेची महासभा होणे आवश्यक आहे. महासभेत गटनेते आपआपल्या पक्षातील नगरसेवकांची सदस्यपदी नियुक्ती होण्यासाठी नावे देतात. त्यामुळे येत्या आठ दिवसांत महासभा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पक्षनिहाय निवृत्त सदस्य
नगरसेविका रिता भाकरे (शिवसेना)
नगरसेवक परशुराम गायकवाड (शिवसेना)
नगरसेवक सचिन शिंदे (शिवसेना),
नगरसेविका मीनाताई चव्हाण (राष्ट्रवादी)
नगरसेवक समद खान (राष्ट्रवादी),
नगरसेविका वंदना ताठे (भाजप)
नगरसेवक रवींद्र बारस्कर (भाजप),
नगरसेवक मुद्दसर शेख (बसपा).

Back to top button