नगर : घरकुलासाठी जागा खरेदीला मिळतात पैसे ! | पुढारी

नगर : घरकुलासाठी जागा खरेदीला मिळतात पैसे !

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात घरकुल योजनांना गती येत असताना, ज्यांना घरे मंजूर आहेत, मात्र जागा नाहीत, त्यांना पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठीही जास्तीत जास्त 50 हजारांपर्यंत मदत केली जात आहे. चालू वर्षात 50 लाभार्थ्यांना अशाप्रकारे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. आतापर्यंत 13 लाभार्थ्यांना पैसे मिळाले असून, आणखी 30 प्रस्तावांनाही मंजुरी मिळाल्याचे सूत्रांकडून समजले. घरकुल योजनेसाठी ज्या बीपीएलधारकांची निवड करण्यात आली आहे. तसेच शबरी असेल, किंवा अन्य योजनेतून घरकुल मंजूर झाले, मात्र त्यांना केवळ मालकीची जागा नसल्यामुळे घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले होते.

अशा लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्याकरिता पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून अर्थसहाय्य दिले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी योजनेतून लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी स्वतः लक्ष घातलेले आहे.

काय आहे पंडित दिनदयाळ योजना ?

या योजनेतून ज्यांना घरकुले बांधण्यासाठी जागा नाहीत, त्यांना जागा खरेदीसाठी जास्तीत जास्त 50 आणि कमीत 10 हजारांची रक्कम खरेदी खतातील नमूद मूल्यांकनानुसार दिली जाते. त्यामुळे हक्काची जागा खरेदीसाठी घरकुल लाभार्थ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळत आहे.

मंजुरीची प्रक्रिया कशी आहे ?

शासनाने समिती गठीत केलेली आहे. ज्यांना योजनेतून जागा खरेदी करायची आहे, त्यांनी अगोदर ग्रामपंचायतीशी संपर्क करायचा. त्यांना पूर्वकल्पना देऊन जागा खरेदी करायची. त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून आलेल्या संबंधित लाभार्थ्याच्या प्रस्तावाची गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेतील समिती पडताळणी करते. यामध्ये लाभार्थ्यांने खरोखरच जागा खरेदी केली आहे का, त्याचे शासकीय मुल्यांकन किती आहे, ते पाहून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे अर्थसहाय देणेबाबत शिफारस केली जाते. या ठिकाणी प्रकल्प संचालकांच्या स्वाक्षरीनंतर सीईओंकडून मदतीसाठी शिक्कामोर्तब केले जाते.

नव्याने 30 लाभार्थ्यांना आर्थिक मदत

गेल्या दोन दिवसांपूर्वीच जागा खरेदीसाठी अर्थसहाय मिळावे, यासाठी 30 प्रस्ताव आलेले आहेत. हे प्रस्ताव मंजूर झाले असून, संबंधित लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी 13 लाख 22 हजार 400 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. प्रस्तावांची संख्या वाढती आहे.

पंडीत दिनदयाळ योजनेतून जागा खरेदीकरण्यासाठी जास्तीत जास्त 50 हजारांपर्यंत अर्थसहायक केले जाते. ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समितीशी संपर्क करावा. त्याठिकाणी आवश्यक ते मार्गदर्शन मिळेल.
-किरण साळवे, कनिष्ठ अभियंता, ग्रामीण विकास यंत्रणा, नगर

गेल्या वर्षी 19 लाभार्थ्यांना दिला लाभ
पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून गेल्यावर्षी 20 लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट होते. त्यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. सादर झालेल्या 19 प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यांना लाभ देण्यात आला होता.

चालू वर्षी 13 लाभार्थ्यांना 4 लाख 86 हजार
यंदा 50 उद्दिष्ट आले असले, तरी आणखी प्रस्ताव आल्यानंतर त्यांनाही लाभ देण्यासाठी प्रशासनाने तशी तरतूद केलेली आहे. चालू वर्षात आतापर्यंत 13 जणांना लाभ देण्यात आलेला आहे. कोपरगाव तालुक्यातील हे सर्व 13 लाभार्थी आहेत़. त्यांना जागा खरेदीसाठी 4 लाख 86 हजार 648 अर्थसहाय दिले आहे.

 

Back to top button