नगर : आदिवासी महिलांना जातीवाचक शिवीगाळसह मारहाण | पुढारी

नगर : आदिवासी महिलांना जातीवाचक शिवीगाळसह मारहाण

राहाता : पुढारी वृत्तसेवा :  शेतात कांदे लावण्याचे कामाचे पैसे मागितल्याने शेतमालकाने आदिवासी समाजाच्या मजूर महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना राहाता शहरात घडली आहे. या घटनेप्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात शेतमालक पती-पत्नी विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शेतमालक गायकवाड यांच्या घरासमोर ही घटना घडली.
आदिवासी समाजातील शेतमजुरी करणार्‍या महिला यांनी राहाता शहरातील पिंपळवाडी रोडलगत असलेल्या प्रशांत गायकवाड यांचे शेतात एक महिन्यापूर्वी कांदा लावण्याचे काम केले होते.

एक महिना पेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्याने संबंधित शेतमजूर महिला गायकवाड यांच्या घरी गेल्या. त्यांनी गायकवाड यांच्याकडे आपल्या कामाचे पैसे मागितले असता शेतमालक प्रशांत गायकवाड व त्यांची पत्नी अनिता गायकवाड यांनी शेतमजूर महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली.

प्रशांत गायकवाड यांनी फिर्यादीचे अंगावरील पंजाबी ड्रेसचा टॉप फाडला व फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून पोटात लाथा मारल्या. ‘तुम्ही माझ्या घरी येऊन पैसे मागतात, एवढी तुमची हिम्मत झाली का? तुमच्या सर्वांची धिंड काढू’ अशी धमकी दिली.
फिर्यादी मुलीची आईने आरोपी प्रशांत गायकवाड यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ आरोपींनी केली. तेथे जवळच पडलेली कुर्‍हाड उचलून तुमचे एकेकाचे मुडदे पाडतो, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेत काही महिला जखमी झाल्याचे पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यातील फिर्यादी महिला व तिच्या सोबत असलेल्या महिला घाबरल्याने त्यांनी तिथून जीव वाचवत पळ काढला. त्यानंतर राहाता पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी फिर्यादीच्या दाखल तक्रारीवरून सबंधीत पती-पत्नी यांच्यावर अनुसुचित जाती जमाती व इतर कल्मान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Back to top button