खेड : तलाठी कार्यालय बांधकामात माती? ठेकेदाराचा प्रताप | पुढारी

खेड : तलाठी कार्यालय बांधकामात माती? ठेकेदाराचा प्रताप

खेड;(ता .कर्जत) पुढारी वृत्तसेवा : शिंपोरा येथे सुरू असलेल्या नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काँक्रिटच्या खांबांचे सिमेंट हात लावला तरी जमिनदोस्त होत असल्याने त्यात ठेकेदारकडून मातीचा वापर झाल्याची शंका व्यक्त होत आहे. या कामावर आक्षेप घेत उपसरपंच राहुल भोसले यांनी ते बंद पाडले आहे. अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत, ’महसूल व वन विभाग इमारती बांधणे’ या लेखाशीर्षाखाली तलाठी कार्यालयाचे 34 लाख रूपयांचे काम मंजूर झाले आहे.

मात्र, या कामाचा दर्जा पाहता ठेकेदाराने बांधकाम करताना सिमेंट वापरले की माती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत कामाचा दर्जा सुधारला जात नाही, तोपर्यंत हे काम सुरू होऊ देणार नसल्याचा पावित्रा उपसरपंच राहुल भोसले यांनी घेतला आहे. शासनाच्या एवढ्या मोठ्या निधीचा अशा प्रकारे अपव्यय होत असल्याने, जिल्हा प्रशासनाने अशा ठेकेदारावर कारवाई करून काम रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी हेमंत काळे, प्रशांत गायकवाड, अमोल चव्हाण, सोसायटीचे संचालक दत्तात्रय माळवदकर, शहाजी माने, ग्रा. पं. सदस्य शेटे, महेंद्र काळे आदी उपस्थित होते.

आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष
आमदार रोहित पवार यांनी मोठ्या थाटामाटात तलाठी कार्यालयांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राबवला खरा. मात्र, संबंधित ठेकेदाराला या कामांबाबत दर्जा ठेवता आला नाही. त्यामुळे या ठेकेदारावर आ.पवार काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button