कर्जत-जामखेडला नव्या 30 बस; मुख्यमंत्र्यांकडून परिवहन सचिवांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश | पुढारी

कर्जत-जामखेडला नव्या 30 बस; मुख्यमंत्र्यांकडून परिवहन सचिवांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड तालुक्यांंसाठी एसटी महामंडळाच्या 30 नव्या बस उपलब्ध करून देण्याबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन सचिवांना दिले आहेत. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात विनंती केली होती. कर्जत येथील बस आगाराचा प्रश्न हा गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी दीड वर्षात तो मार्गी लावला.

तसेच, जामखेड येथील बसस्थानक पुनर्बांधणी व परिसरात व्यापारी गाळे बांधकाम देखील सध्या सुरू आहे. दोन्ही कामे सध्या पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे धोरणाप्रमाणे जेव्हा डेपोचे हे काम विशिष्ट टक्केवारीच्या पुढे जाते, तेव्हा बसेसची मागणी करावी लागते. जेणेकरून त्या संबंधित डेपोला बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. याच अनुषंगाने आता हे काम 70 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.

तसेच, दोन्ही बसस्थानकांवर विद्यार्थी व प्रवाशांची संख्या अधिक असल्याने बसेसची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कर्जत व जामखेड तालुक्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 30 नवीन बस उपलब्ध करून देण्याबाबत त्यांना विनंती केली. त्यावर तत्काळ कार्यवाही करत मुख्यमंत्री शिंदे यांनी परिवहन सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण होऊन बस उपलब्ध होणार असून, त्यामुळे कर्जत व जामखेडच्या विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. कोरोना प्रादुर्भाव असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार पवार यांनी अवघ्या दीड वर्षात कर्जतला डेपो मंजूर करून, त्यासाठी भरघोस निधीही मंजूर करून आणला. त्याचे काम आता पूर्णत्वास जात आहे. आता अधिक बस उपलब्ध होण्यासाठी आ. पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन कर्जत, जामखेड आगारासाठी नवीन 30बस उपलब्ध करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
                                                                          – आमदार रोहित पवार

Back to top button