नगर : जलजीवन योजनेची जागा ठरलेली नसताना, पाईपखरेदी; सर्व निविदा, देयकांची चौकशी करा | पुढारी

नगर : जलजीवन योजनेची जागा ठरलेली नसताना, पाईपखरेदी; सर्व निविदा, देयकांची चौकशी करा

नगर; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेतील आनंदवाडीच्या कामांत सर्वे पूर्ण झालेला नाही, कामाची जागा ठरलेली नाही , तरीही संबंधित अधिकार्‍यांनी पाईप खरेदी केले आहे. ही बाब गंभीर असून, कार्यकारी अभियंता गडदे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व निविदा व अदा केलेल्या सर्व बिलांची पडताळणी करण्यात यावी, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊन शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाईची मागणी करू, असा इशारा माजी जि.प. सदस्या पंचशिला गिरमकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिला आहे.

सीईओ येरेकर यांनी जलजीवन योजनेत नगरला टॉपवर आणले आहे. मात्र, असे असताना निविदा, ठेकेदारांची कागदपत्रे, अपात्र केलेल्या निविदा, यातून तक्रारी वाढत्याच आहेत. काल आणखी एक तक्रार आलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी पाणी योजनेचा चुकीचा सर्वे रद्द करून संपूर्ण गावाला योजनेचा फायदा होईल, यासाठी पुन्हा सर्वे करावा, अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र याबाबत कार्यवाही झालेली नाही. योजनेची जागा निश्चित नसताना कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदारास बिल अदा करण्याची घाई का केली, याची चौकशी करावी, जर सर्वेच पूर्ण नसेल व जागा निश्चितीही नाही, तर कोणत्या नियमांच्या आधारे पाईप खरेदी करण्यात आली, असा सवालही गिरमकर यांनी केला आहे.

दरम्यान, संबंधित अधिकार्‍यांविषयी अनेक तक्रारी आहेत. ते योजनेत काम अडवून तसेच फाईल स्वतःकडे ठेवून हेतू पूर्ण होईपर्यंत काम करत नाही. आनंदवाडी योजनेत जागेचा वाद निर्माण झालेला असताना आम्ही पाईपचे पैसे ठेकेदाराला अदा करू नये, तसा जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत यांनी ठराव दिला होता. जागा उपलब्ध नसल्याने योजना पूर्ण करण्यात अडचणी होत्या.

त्यामुळे सरकारच्या पैशांचा अपव्यय होऊ नये, असे कार्यकारी अभियंता गडदे यांना कळविले होते.असे असताना त्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही. आम्ही विचारणा केली असता, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितल्याने सदरचे काम केल्याचे उत्तर मिळाल्याचेही गिरमकर म्हणाल्या. त्यामुळे गडदे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व निविदा व जलजीवन मिशन अंतर्गत अदा केलेल्या सर्व बिलांची पडताळणी करण्यात यावी, अशीही मागणी पंचशिला व रमेश गिरमकर यांनी केली आहे.

कार्यकारी अभियंत्यांना घेराव!
सोमवारी दुपारी रमेश गिरमकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता गडदे यांना आनंदवाडीच्या योजनेवरून घेराव घातला. तसेच कामे देताना कशाप्रकारे अडवणूक केली जाते, याचा पाढा वाचतानाच जाबही विचारण्यात आला. यावेळी उपस्थित अन्य ठेकेदारांनीही आपल्याला कसे डावलले, याबाबत सुरात सूर आळविला.

गिरमकर हे माझ्याकडे आले होते. त्यांच्या काही शंका होत्या, त्यावर सविस्तर चर्चा होऊन त्याचे निराकरणही झाले आहे. त्यातून त्यांचे समाधान झालेले आहे.

                                                        -आशिष येरेकर, सीईओ जि.प.

आमच्या तक्रारीची सीईओंनी दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना पत्र काढून, याप्रकरणी चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, असे न घडल्यास न्यायालयात जाऊ.

                                                            -रमेश गिरमकर, श्रीगोंदा

Back to top button