

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने जम-जम कॉलनीमध्ये छापा टाकून सुमारे साडेचारशे किलो गोमांस हस्तगत केले. याप्रकरणी पोलिसांनी कत्तलखाण्याचा चालक राजीक रज्जाक शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला, मात्र नेहमीप्रमाणे कत्तलखान्याचा चालक पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला.
संगमनेरातील जम-जम कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल झाल्याची माहिती पो. नि. भगवान मथुरे यांना समजली. त्यांनी पोलिसांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. यानंतर स. पो. नि. राजेंद्र पवार, पो. उ. नि. विठ्ठल पवार यांच्यासह पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास जम- जम कॉलनीमध्ये छापा टाकला. यावेळी एका पत्र्याच्या शेडमध्ये काही गोवंश जनावरांची कत्तल करुन त्यांचे मांस साठवून ठेवल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिस पथकाने त्या कत्तल खाण्यातील सुमारे 450 किलो गोवंशाचे गोमांस हस्तगत केले.
या प्रकरणी पोलिस शिपाई महादू खाडे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून राजीक रज्जाक शेख (रा. संगमनेर)याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यासह प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. ना. गायकवाड करीत आहे. संगमनेरचे पोलिस गोहत्या रोखण्यासाठी अधून-मधून कारवाई करतात, परंतु पुन्हा जैसे-थे चित्र दिसत असल्याने कत्तलखाणे चालकांवर आवर घालण्याची मागणी होत आहे. शेकडो छापे टाकून देखील येथील कत्तलखाने का बंद झाले नाहीत.
संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 69 जनावरांची पोलिसांनी कत्तलीतून मुक्तता केली होती. राजीक रज्जाक शेख या कत्तलखाण्याच्या चालकावर गुन्हा दाखल केला होता. या घटनेला अवघे आठ दिवस होत नाहीत तोच पुन्हा आज पोलिसांनी जम-जम कॉलनीत केलेल्या कारवाईमध्ये तोच कत्तल खाण्याचा चालक आहे. तो याहीवेळी पसार झाला. यावरून पोलिस फक्त वरिष्ठांना दाखविण्यासाठीचं कारवाई करण्याचा फार्स करतात की काय, अशी संतप्त चर्चा आता संगमनेरच्या गोप्रेमी नागरिकांमधून होत आहे.