नगर: दरेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

file photo
file photo

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: शेतात गवत कापत असताना अचानक आलेल्या बिबट्याने महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दरेवाडी येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात शकुंतला शंकर मैड (वय ५५) या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दरेवाडी शिवारातील लांडगदरा येथे शकुंतला शंकर मैड राहत आहेत. त्या घरापासून काही अंतरावरील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतावरील बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शकुंतला मैड यांच्यावर हल्ला चढविला. बिबट्याने शकुंतला यांच्या दोन्ही हाताला चावा घेत गंभीररीत्या जखमी केले आहे. शकुंतला यांनी जोरजोरात आरडा ओरडा केला असता आजूबाजूचे नागरिक धावत आले. त्या नंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली.

शकुंतलाबाई यांना तातडीने उपचारासाठी साकूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. दिवसा ढवळ्या बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जांभूळवाडी येथील सटवा राणबा खेमनर यांच्या बकऱ्यावरसुद्धा बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले. बिबट्याचा संचार भरदिवसा वाढत असून नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news