नेवासा : बायकोला तलवारीने धमकाविणारा अटकेत | पुढारी

नेवासा : बायकोला तलवारीने धमकाविणारा अटकेत

नेवासा(नगर); पुढारी वृत्तसेवा : बायकोला तलवारीसारख्या हत्याराने धमकविणार्‍या नवर्‍याला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे.
जयश्री विकी चौधरी (रा.मार्केट यार्ड, नेवासा खुर्द) या महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. तिचा नवरा विकी नंदू चौधरी हा हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन घरात बसलेला असून, तिला घरात जाण्याची भीती वाटते, असे तिने ठाणे अंमलदार जयवंत तोडमल यांना सांगितले.
नाशिक पदवीधर मतदानाचे अनुषंगाने रविवारी (दि.29) नेवासा फाटा येथे पोलिसांकडून नाकाबंदी करून तपासणी सुरू होती.

तेथे उपस्थित असलेले उपनिरीक्षक भोंबे, हवालदार तुळशीराम गिते, राठोड, सुजित करंजकर यांना ठाणे अंमलदार तोडमल यांनी याबाबत कल्पना दिली. त्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे विकी चौधरी हा हातात धारदार शस्त्र घेऊन घरात बसलेला दिसला. पोलिसांनी धारदार तलवारीसह त्याला ताब्यात घेतले. पोलिस कर्मचारी गणेश गलधर यांच्या फिर्यादीवरुन चौधरी यांच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Back to top button