वाळकी : कत्तलीसाठी नेणार्‍या जनावरांचा टेम्पो पकडला; पावणेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत | पुढारी

वाळकी : कत्तलीसाठी नेणार्‍या जनावरांचा टेम्पो पकडला; पावणेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वाळकी(नगर ); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निमगांव वाघा-केडगांव रस्त्यावरून कत्तलखाण्यासाठी जनावरे घेऊन चाललेला टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. पाच जिंवत जनावरांसह टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेत 5 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. निमगाव वाघा ते केडगाव रस्त्यावर काही व्यक्ती पिवळ्या रंगाच्या टेम्पोमधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक व तालुका पोलिसांच्या मदतीने निमगाव वाघा ते केडगाव रस्त्यावर निमगाव शिवारात सापळा लावला.

थोड्या वेळात पिवळ्या रंगाचा टेम्पो येताना दिसताच त्याला थांबण्याचा इशारा करण्यात आला . टॅम्पो थांबताच त्यामध्ये बसलेली एक व्यक्ती उडी टाळून पळून गेली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो मिळून आला नाही. टेम्पोचालक विलास वामन ढगे (रा. वाळकी ता . नगर) यास ताब्यात घेतले. टेम्पोत पाच लहान-मोठे जिवंत जनावरे व एक मयत बैल दाटीवाटीने टेम्पोत भरलेले दिसला. टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता, जाहिर रऊफ सय्यद (रा. कोठला , घासगल्ली नगर) यांच्या मालकीची जनावरे असून, कत्तलीसाठी चालल्याची कबुली त्याने दिली.

टेम्पोमध्ये पाच लहान-मोठे जनावरे व एक मयत बैल आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण 5 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस करीत आहेत.

Back to top button