नगर : अपहृत अल्पवयीन मुलीचा बारा तासांत शोध | पुढारी

नगर : अपहृत अल्पवयीन मुलीचा बारा तासांत शोध

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी ऊसतोडणी कामगाराच्या अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा बारा तासांच्या आत शोध लावून तिला पालकाच्या स्वाधीन केले. तिचे अपहरण करणार्‍या सुप्रिया सचिन काळे (वय 22, रा. सातववाडी, अरणगाव दुमाला, ता.श्रीगोंदा) हीस ताब्यात घेण्यात आले आहे. एका साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी आलेल्या एका कामगाराचे कुटुंब मोकळ्या जागेत निवारा करून वास्तव्य करीत होते. 27 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे ते कुटंबीयासह झोपले असता, सकाळी सहा वाजता उठल्यानंतर त्यांना त्यांची 9 वर्षांची मोठी मुलगी तेथे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी दिवसभर परिसरात शोध घेतला. मात्र, मुलीचा शोध लागला नाही.

त्यानंतर त्यांनी रात्री 9 वाजता बेलवंडी पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. मुलीचे वय पाहता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे व पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी शहानिशा केल्यानंतर मुलीचे अपहरण झाल्याने निदर्शनास आले. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्वतःकडे तपास घेतला.

अपहरण झालेल्या मुलीबाबत परिसरातील नागरिकांशी तसेच पोलिस पाटलांशी संपर्क करून माहिती घेतली. सोशल मीडियावर मुलीची माहिती देण्यात आली. त्यावेळी माठ येथील ग्रामस्थांनी या वर्णनाची मुलगी उक्कडगाव बसस्थानकावर लहान बाळासह असल्याचे पोलिसांना फोनद्वारे सांगितले. त्यानंतर पोलिस निरीक्षक आहेर व सहकार्‍यांनी अपहरण झालेली मुलगी तीच असल्याची खात्री केली. तिला एक आदिवासी समाजाच्या महिलेने पहाटे बळजबरीने नेल्याचे सांगितले.

त्यावरून आरोपी सुप्रिया काळे हीस ताब्यात घेण्यात आले आहे. बेलवंडीचे प्रभारी पोलिस निरीक्षक आहेर, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, राजेंद्र चाटे, सहायक फौजदार मारुती कोळपे, रावसाहेब शिंदे, हवालदार डी. आर.पठारे, कॉन्स्टेबल कैलास शिपनकर, पवार, संदीप दिवटे,. सतीश शिंदे, चालक विकास सोनवणे, भाऊसाहेब शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. बारा तासांत मुलगी शोधून आरोपी महिलेला अटक केल्याप्रकरणी पोलिस त्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

Back to top button