नगर : पदवीधरसाठी उद्या मतदान | पुढारी

नगर : पदवीधरसाठी उद्या मतदान

नगर : पुढारी वृत्तसेवा : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी 4 वाजता थंडावला. उद्या सोमवारी मतदान होणार असून, पाच जिल्ह्यातील 338 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, निवडणूक विभागाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपचा उमेदवार निवडणूक रिंगणात नाही.

सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष, तर शुभांगी पाटील यांनाही भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे, नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीचे सुरेश पवार, अनिल तेजा, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, अविनाश माळी, इरफान मो इसाक, ईश्वर पाटील, बाळासाहेब घोरपडे, अ‍ॅड. जुबेर नासिर शेख, सुभाष जंगले, नितीन सरोदे, पोपट बनकर, सुभाष चिंधे, संजय माळी असे एकूण 16 उमेदवार नशीब अजमावत आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी

पदवीधर मतदारसंघासाठी नगर जिल्ह्यात एकूण 147 मतदान केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे एकूण 5 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास आठशे कर्मचार्‍यांना दोनदा निवडणूक कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. रविवारी रात्री मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर मुक्कामी जाणार आहेत.

Back to top button