नगर : अवकाळी पावसाचा रब्बीला फटका | पुढारी

नगर : अवकाळी पावसाचा रब्बीला फटका

टाकळीभान/राहुरी : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील टाकळीभानसह पुर्वभाग, बेलापूर तसेच राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी (दि. 26) च्या रात्री 10 वाजता झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषध फवारणी केली होती. मात्र काल रात्री वार्‍यासोबत जोरदार पावसाची सुरुवात झाली. आणि उभे पिके जमीन दोस्त झाली. काही वेळातच होत्याचे नव्हते झाले.

सर्वात जास्त नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर महिन्यात पेरणी झालेल्या गहू पिकाला पावसाचा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शेतकर्‍यांच्या क्षेत्राचा शंभर एकर पेक्षाही जास्त गहू पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये रतनबाई बोडखे, विकास मगर, बापूसाहेब कोकणे, शकुंतला पटारे, निलेश मगर, संभाजी पटारे, अमित सटाले, धनराज कोकणे, कारभारी बोडखे, दविद रणनवरे, संगीता सपकाळ, अंजनाबाई कोकणे, संजय रणनवरे यासह बहुतांश शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

राहुरी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये अचानक अवकाळी पाऊस कोसळल्याने अक्षरशः शेतकर्‍यांची धावपळ उडवून दिली. या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळीच्या तडाख्याने देवळाली प्रवरा, टाकळीमिया, वांबोरी, म्हैसगाव, ताहाराबाद, सोनगाव सात्रळ, बारागाव नांदूर आदी सर्वदूर झालेल्या पावसाने वीटभट्टीचे व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने भरीव मदत करावी मागणी केली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या कांदा, हरभरा व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राहुरी प्रवरातील अवकाळी पावसाने वीटभट्टी चालकांना मोठा फटका बसला आहे. सर्वांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना
टाकळीभानसह परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पीक पहाणी करून करण्याच्या सूचना कामगार तलाठी यांना देण्यात आल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले.

Back to top button