नगर : जेऊर येथे बेकायदा सावकारकी..! | पुढारी

नगर : जेऊर येथे बेकायदा सावकारकी..!

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा :  बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील जेऊर येथील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी नेवाशाचे सहायक निबंधक गोकुळ नांगरे यांना दिले आहेत. नांगरे यांनी गुन्हा नोंदविण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहायक निबंधक आर. के.शिंदे यांची नियुक्ती केली आहे. मजलेशहर (ता. शेवगाव)येथील बापूसाहेब मोहन लोंढे यांनी त्यांच्या मालकीची वडुले (ता. नेवासा) येथील गट नं.38 मधील 5 एकर 38 गुंठे शेतजमीन गहाण देऊन दवाखाना खर्चासाठी बाळू विष्णू ताके आणि त्यांची पत्नी सुनीता बाळू ताके (रा.जेऊर हैबती, ता. नेवासा) यांच्याकडून व्याजाने 4 लाख रुपये घेतले होते.

या पैशाच्या हमीसाठी गहाण म्हणून कायम खरेदी खताने लोंढे यांनी स्वतःची जमीन ताके यांना लिहून दिली. परंतु सदर हा व्यवहार व्याजाने पैसे घेतल्याबाबतचा मुद्रांक पेपरवर करारनामा आपसात करण्यात आला होता. त्या करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे मुद्दल व व्याज परत दिल्यानंतर जमीन पुन्हा खरेदीखताने लोंढे यांच्या नावावर करण्याचे ठरले होते. परंतु लोंढे हे ताके यांना त्यांचे व्याजासह पैसे देण्यास तयार असून, ही शेतजमीन ताके हे परत देत नाहीत, अशी तक्रार शपथपत्रामध्ये दाखल केली होती.

त्या अनुषंगाने सहायक निबंधकांसमोर झालेल्या सुनावणीत सदरचा व्यवहार हा बेकायदा सावकारी व्यवहार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे उपरोक्त मालमत्तेबाबत निर्णय देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांना असल्याने तसा अहवाल सादर केला होता. सदर अहवाल पाहता व्यवहाराबाबत बेकायदा छुपा सावकारी व्यवहार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नमूद केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी नेवाशाचे सहायक निबंधक गोकुळ नांगरे यांना दिले होते. या आदेशावरुन नांगरे यांनी संबंधित दाम्पत्यावर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्क निबंधक आर.के.शिंदे यांची नियुक्ती केली.

लवकरच गुन्हा दाखल होणार
जिल्हा उपनिबंधकांनी बेकायदा सावकारकीचा व्यवहार असल्याबाबत आदेशात नमूद केले असल्याने वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकार्‍याची नेमणूक केली आहे. संबंधित अधिकारी लवकरात लवकर गुन्हा दाखल करतील, असे नेवाशाचे सहायक निबंधक गोकुळ नांगरे यांनी सांगितले.

Back to top button