शेतमाल कर्ज वाटपात बाजार समिती अव्वल; श्रीरामपुरातील 31 शेतकर्‍यांना 42 लाखांचे कर्ज वितरित | पुढारी

शेतमाल कर्ज वाटपात बाजार समिती अव्वल; श्रीरामपुरातील 31 शेतकर्‍यांना 42 लाखांचे कर्ज वितरित

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतमाल तारण कर्ज वाटपा मध्ये श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ने नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. अहमदनगर सह धुळे, नंदुरबार, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये या बाजार समितीने पणन मंडळाच्या या योजनेत पहिला येण्याचा मान मिळविला आहे. गेल्या तीन वर्षापासून या योजनेमध्ये या बाजार समितीने पहिला येण्याचा मान कायम ठेवला आहे. शेतकर्‍याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो.

साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकर्‍यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा, या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन 1990 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असुन या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते.

सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणार्‍या बाजार समित्यांना पणन कडून 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते.या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्केपर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दरात तारण कर्ज देण्यात येते.

या योजनेंतर्गत शेतकर्‍याने उत्पादित केलेला शेतमाल बाजार समितीच्या गोदामात तारण योजनेंतर्गत ठेवल्यास संबंधित शेतकर्‍यास शेतमालासाठी एकूण किंमतीच्या 75 टक्के रक्क्म तारण कर्ज म्हणून मिळते. काजू बीसाठी एकूण किंमतीच्या 75 टक्के रक्कम जास्तीत जास्त 80 रुपये प्रति किलो तसेच बेदाणासाठी एकूण किंमतीच्या कमाल 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 7500 प्रति क्विंटल यातील कमी असणारी रक्कम तारण कर्ज म्हणून बाजार समिती मार्फत देण्यात येते. या योजनेचा शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहनही प्रशासक दीपक नागरगोजे यांनी केले आहे.

तारण कर्ज उपलब्ध करून देणे योजनेचा उद्देश
कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे राज्यातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाच्या काढणी हंगामात कमी भावाने विक्री न करता तो शेतमाल बाजार समितीच्या गोदामामध्ये तारणास ठेवून शेतकर्‍यांना तारण कर्जाच्या स्वरुपात सुलभ आणि त्वरित कर्ज उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Back to top button