शेवगाव तालुका : वीजबिल वसुलीत महावितरणचा भेदभाव; शासकीय कार्यालयांना अभय | पुढारी

शेवगाव तालुका : वीजबिल वसुलीत महावितरणचा भेदभाव; शासकीय कार्यालयांना अभय

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : महावितरणकडून वीजबिल थकबाकी वसुलीत भेदभाव करण्यात असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयांना अभय, तर इतर ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शेवगाव तहसील कार्यालयाकडे सुमारे 8 लाख रुपये थकबाकी असताना, तेथील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. मात्र, दुसरीकडे वीजबिल थकल्याने शहरातील प्राथमिक शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने राहिल्याने महावितरण कंपनीने वीज वसुलीचा धडाका सुरू केला आहे. थकबाकी असलेल्या घरगुती, वाणिज्य, औद्योगिक अथवा इतर ग्राहकाने वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

महावितरणची ही सक्तीची वसुली अनेक ग्राहकांना त्रासदायक ठरत असली तरी, बिल थकल्यास आपला वीजपुरवठा बंद केला जाईल, या भितीने वेळेवर बिल भरण्यासाठी ग्राहकांना आर्थिक तरतूद करावी लागत आहे. त्यात वापरलेल्या वीज युनिटपेक्षा स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज विक्री कर हीच रक्कम जास्त येते. त्यामुळे कमी वेळ विजेचा वापर करूनही बिलाची रक्कम वाढीव येत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, इतर ग्राहकांकडून पठाणी वसुली चालू असताना, अनेक महिन्यांपासून थकबाकी असलेल्या शासकीय कार्यालयांची वीजपुरवठा मात्र महावितरणकडून खंडित केला जात नाही.

एकट्या शेवगाव तहसील कार्यालयाची वर्षापासून 7 लाख 75 हजार 141 रूपयेे थकबाकी आहे. तर, पंचायत समिती कार्यालय 97 हजार 570 रुपये, पोलिस उपविभागीय कार्यालय 39 हजार 525 रुपये, तहसीलचे पुरवठा गोदाम 30 हजार 542 रुपये, राज्य सेतू कार्यालय 28 हजार 781 रुपये, आरोग्य विभाग ऑक्सिजन प्लॅन्ट 19 हजार 228 रुपये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था 15 हजार 838 रुपये, ग्रामीण रुग्णालय 12 हजार 32 रुपये, गटविकास अधिकारी जुने पंचायत समिती कार्यालय 10 हजार 240 रुपये, पोलिस ठाणे 10 हजार 68 रुपये, नगरपरिषद गार्डन 9 हजार 427 रुपये अशी थकबाकी असताना, येथील वीजपुरवठा खंडित केला जात नाही.

नगरपरिषद भाजी मंडईकडे 8 हजार रुपये व नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनाची 24 हजार रूपये थकबाकी असल्याने येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील काही वीजपुरवठा खंडित केल्याने, त्यांना चिमणीच्या उजेडात राहण्याची वेळ आली आहे.

  • तहसील कार्यालयाकडे 8 लाख रुपये थकित
  • नगरपरिषदेच्या दोन विभागांची वीज तोडली
  • राजकीय नेत्यांची रात्रही चिमणीच्या उजेडात

अधिकार्‍यास एक लाखाचा दंड
वीजबिल वसुली अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने अधिकार्‍यांवरही कारवाईचा बडगा सुरू केला आहे. वसुलीस हयगय होत असल्याने महावितरणने शेवगाव शहर सहाय्यक अभियंत्यास एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. सदर दंड त्यांच्या वेतनातून वसूल केला आहे.

Back to top button