कर्जत / राशीन; पुढारी वृत्तसेवा : कलाकेंद्रावर संगीत पार्टीत नृत्य करण्यासाठी तुमच्याकडे येतो, या बहाण्याने उस्मानाबादच्या पार्टीला कर्जतला बोलावून घेण्यात आले. त्यांच्याकडून उचल घेतल्यानंतर चाकूचा धाक दाखवत मारहाण करून जबरदस्तीने रोख रक्कम, सोने लुटत मोबाईलवर डल्ला मारण्यात आला. याप्रकरणी दोघांना कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. निखील सचिन भोसले (वय 20) व सचिन रमेश भोसले (वय 45, दोघे रा.चिलवडी, ता कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत.
सूरज भूषणराव आंबेकर (रा.लातूर, हल्ली आळणी, ता.जि.उस्मानाबाद) यांचा संगीत पार्टीचा व्यवसाय असून, ते आळणीफाटा येथे पिंजरा सांस्कृतिक कला केंद्रात पार्टी चालवितात. त्यांच्या पार्टीत एक नर्तिका कामाला असून, तिचे सोशल मीडियावर वेगवेगळे अकाउंट आहेत. इन्स्टाग्रामवर नृत्याचे विविध व्हिडिओ अपलोड करत असल्याने तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. आरती भोसले हिची आरोपींशी या अकाउंटवरून ओळख झाली होती व अधूनमधून फोनवर बोलणे होत होते. मागील दहा दिवसांपासून आरती भोसले (रा.राशीन) ही मला तुमच्या पार्टीत काम करायचे आहे, असे म्हणत होती आणि फिर्यादीला पार्टीत नर्तिकांची गरज होती. त्यामुळे उचल देऊन तिला पार्टीत घेण्याचे ठरले.
शुक्रवारी (दि..20) 70 हजार घेऊन या, ते घरी द्या. दोन मुली आहेत व त्यांना प्रत्येकी 40 हजार घेऊन या, असे आरती भोसले हिने सांगितले. त्यानुसार आंबेकर व इतर असे चौघे करमाळा रोडवर पोहचले. तेथे त्यांनी रोख 70 हजार दिले. अन्य दोन मुली पुढे राहतात, असा बहाणा करून गाडी अज्ञातस्थळी आणल्यावर दोन अनोळखी मुली व अनोळखी व्यक्ती गाडीच्या दिशेने आले. मुलींना देण्यासाठी रोख रक्कम नसल्याने एटीएममधून पैसे काढतो, असे आंबेकर म्हणाले. ते गाडीत बसताच लपून बसलेल्या सात ते आठ जणांनी त्यांना खाली पाडत गळ्यातील सोन्याची चेन, खिशातील पाकीट व हातातील अंगठी काढून घेतली.
दुसर्याने चाकूचा धाक दाखवून चालकाकडून मोबाईल व पाकीट बळजबरीने हिसकावून घेतले. गाडीत बसलेल्या आंबेकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. सचिन कापसे यांना मारहाण करून त्यांच्या हातातील अंगठी व खिशातील पाकीट काढून घेऊन त्यांना कॅनॉलमध्ये ढकलून दिले. वाहनात बसलेल्या सहचालकाचा मोबाईल काढून घेत सोबतच्या नर्तिके मारहाण करत तिचाही मोबाईल काढून घेतला. या गुन्ह्यात एकूण 1 लाख 27 हजारांचा मुद्देमाल लुटल्याची फिर्याद कर्जत पोलिसांत देण्यात आली. त्यावरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अपर पोलिस अधीक्षक यांनीही घटनास्थळी भेट दिली. शोध घेऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक निरीक्षक सतीश गावित, कर्मचारी मारुती काळे, भाऊ काळे, अर्जुन पोकळे, श्याम जाधव, संपत शिंदे, महादेव कोहक, मनोज लातूरकर, गणेश भागडे, संभाजी वाबळे, नितीन नरुटे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक सतीश गावित हे करत आहेत.