नगर : जलजीवनवर ग्रामसभेचा वॉच 26 जानेवारीला विशेष सभा | पुढारी

नगर : जलजीवनवर ग्रामसभेचा वॉच 26 जानेवारीला विशेष सभा

नगर; पुढारी वृत्तसेवा : हर घर जल से नल, या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे. त्याअनुषंगाने दि. 26 जानेवारी रोजीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील 1318 गावांत विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेत गावातील योजनेच्या कामावर आणि अन्य विषयांवर चर्चा होणार आहे.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचे माध्यमातून सन 2019 पासून जलजीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह, पुरेसे 55 लिटर प्रति मानसी, प्रतिदिनी व नियमित स्वरुपात पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

साडेपाच लाख कुटुंबांना पाणी पुरवठा
14 तालुक्यात एकुण 5,42, 400असे 68.01 टक्के कुटुंबांना कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. मार्च 2024 अखेर पर्यंत संपुर्ण जिल्हा हा हर घर नल से जल म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामसभे दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात येवुन व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना अवगत करणेत येणार आहे.

पाच महिलांचा सन्मान
पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या पाच महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील पाणी गुणवत्ता निरीक्षक महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिध्द करणेत येणार आहेत, जेणेकरुन पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल. ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संच संचातुन पाणी नमुना तपासणीचे प्रात्यक्षीत आरोग्य सेवक व जलसुरक्षा मार्फत करणेत येणार आहे.

महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी
ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संचच्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणार्‍या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये देणेत येणार आहे. क्षेत्रिय तपासणी संचाचे मदतीने, पाणी गुणवत्ता तपासणी अनुषंगाने 5 महिलांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करण्यात यावे, जेणेकरुन ग्रामस्थांचा नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाणी गुणवत्तेच्या अनुषंगाने आत्मविश्वास वाढीस लागेल.

कामांची माहिती देणार
ग्रामसभेदरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजुर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे.

लोकवर्गणी करणार चर्चा
योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा लोकवर्गणी 10 टक्के जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम, याबाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.

नळ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वानंतर योजना शाश्वततेच्या दृष्टीने आवश्यक पाणीपट्टी वसुली तसेच योजनेची थकीत पाणीपट्टी वसुलीसंदर्भात विशेष चर्चा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची माहिती दर्शविणारे माहिती फलक योजनेच्या ठिकाणी प्रदर्शित करणेत येणार आहे.

                                                                  -सुरेश शिंदे
                                                    प्रकल्प संचालक जीवन मिशन

जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी 26 जानेवारीच्या ग्रामसभा यशस्वी पार पाडाव्यात व जलजीवन मिशनच्या अनुषंगाने पाणी व स्वच्छता या प्रमुख घटकांवर लोकाच्यांत जनजागृती करावी. ग्रामस्तरावरील सर्व विकास योजनांच्या माहितीबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभागी व्हावे.

                                                             -आशीष येरेकर
                                                       मुख्य कार्यकारी अधिकारी.

Back to top button