नगर : दागिने विकायला आला अन् जाळ्यात अडकला | पुढारी

नगर : दागिने विकायला आला अन् जाळ्यात अडकला

नगर; पुढारी वृत्तसेवा : धूम स्टाईलने दुचाकीवरून महिलांचे चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी आलेला सराईत गुंड एलसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. श्रीरामपूर मधील शिवाजी चौकात एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून भिंगार, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्ह्यांत चोरलेले तीन लाख 52 हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. रियाज फैय्याज इराणी (रा. इराणीगल्ली, ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नगर शहर व भिंगार परिसरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने साथीदारांसह बळजबरीने चोरून नेल्याबाबचे गुन्हे दाखल आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात सराईत चोरटे उजळ माथ्याने फिरून चोर्‍या-लुटमार्‍या करीत आहेत. चेन स्नॅचिंगचे प्रकार तर दर दिवसाआड शहरात घडत असल्याने नगरकरांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. बळजबरीने महिलांचे दागिने चोरणार्‍या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी एलसीबीने मोहिम आखली असून, श्रीरामपूर येथे लावलेल्या सापळ्यात सराईत गुंड रियाज फैय्याज इराणी हा अडकला आहे. श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावून आरोपीला अटक केली. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध एलसीबीच्या पथकाकडून घेतला जात आहे.

आरोपी सराईत गुंड
रियाज फैयाज इराणी हा सराईत गुंड असून, त्याच्यावर पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व फसवणूक असे 20 गुन्हे दाखल आहेत.

या पथकाने केली कारवाई
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, मनोहर शेजवळ, हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, लक्ष्मण खोकले, रणजीत जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, मच्छिंद्र बर्डे व भरत बुधवंत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button