ब्राम्हणीत जनावरांचे मृत्यू थांबता-थांबेना! पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला चावा | पुढारी

ब्राम्हणीत जनावरांचे मृत्यू थांबता-थांबेना! पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला चावा

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ब्राम्हणीतील मानमोडी परिसरात पिसाळल्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जनावरांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्तापर्यंत तब्बल 12 जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर सोनई दौर्‍या दरम्यान वैतागलेल्या पशुपालक शेतकर्‍यांनी थेट हॉटेल राधाकृष्ण येथे एका कार्यक्रमात महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांची भेट घेवून, या प्रकरणी निवेदन देत माहिती दिली. यापूर्वी लहान- मोठी 7 जनावरे दगावली होती. 3 दिवसांत पुन्हा 4 जनावरे दगावली आहेत.

यामध्ये 2 गाया व 2 कालवडींचा समावेश आहे. जनावरांच्या मृत्यूचा आकडा आता 12 इतका झाला आहे. दोन दिवसांत प्रदीप दत्तात्रय जामदार, महेश रमेश नगरे, परसराम भिमाजी नगरे, शिवाजी लक्ष्मण हापसे यांची दुभती जनावरे दगावल्याने हळ-हळ व्यक्त होत आहे.
काही गोठ्यांमधील गाया अद्याप आजारी असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पशु पालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, हा आकडा आणखी वाढण्याची भिती कायम सतावत आहे.

याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून नुकसानग्रस्त पशुपालकांच्या गोठ्यांना भेट देवून माहिती घेतली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनील तुंभारे यांनी सकाळीच सर्व गोठ्यांवर जावून शेतकर्‍यांशी संवाद साधून या प्रकारची माहिती घेवून अधिकार्‍यांना लसीकरण व नुकसानग्रस्त जनावरांचे प्रस्ताव तयार करण्याबाबत सूचना केल्या.

राहुरी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुरेश बानकर, मार्केट कमिटीचे संचालक महेंद्र तांबे, अर्जुनराव पानसंबळ, सुनील अडसुरे, जगन्नाथ चौधरी, ग्रा. पं. सदस्य उमाकांत हापसे, गणेश हापसे, राहुल हापसे, साहेबराव चौधरी, राधेश्याम राजदेव, राहुरीचे पो. नि. राधेश्याम डांगे, नेवासा पो. नि. विजय करे आदींसह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक, महसूल, पशुसंवर्धन, पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता ना. विखे यांच्या प्रयत्नातून मिळणार्‍या मदतीकडे लक्ष आहे.

तत्काळ कार्यवाही करण्याचे दिले आदेश!
पशुसंवर्धन राधाकृष्ण मंत्री विखे पा. यांच्याशी नुकसानग्रस्त पशुपालकांनी भेट घेत चर्चा केली असता, मंत्री विखे यांनी डॉ.सुनील तुंभारे व तहसीलदार एफ. आर. शेख यांना याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करण्याबाबत आदेश दिल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.

Back to top button