कर्जत : बाजार समिती निवडणूक होणार 30 एप्रिलनंतर; नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी संधी उपलब्ध | पुढारी

कर्जत : बाजार समिती निवडणूक होणार 30 एप्रिलनंतर; नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी संधी उपलब्ध

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाच्या आदेशामुळे कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी संधी उपलब्ध होणार कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आता 30 एप्रिल नंतर होणार आहे. तत्पूर्वी तालुक्यातील मुदत संपलेल्या सर्व सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.

बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक सम्राट पाटील यांनी सांगितले की, 30 एप्रिलनंतर बाजार समितीची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी तालुक्यातील सर्व सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील चार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये म. प. सेवा संस्था कर्जत, करपडी विविध कार्यकारी सेवा संस्था, सिद्धिविनायक सेवा संस्था सिद्धटेक, जिजाई सेवा संस्था मिरजगाव यांचा समावेश आहे.

या चारही सेवा संस्थांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, हरकती मागविण्यात आल्या आहेत. या सेवा संस्थांची निवडणूक प्रक्रिया मुदतीत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे या सर्व सेवा संस्थांचे नवीन संचालक मंडळ याचप्रमाणे तालुक्यातील, ज्या आठ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली, त्या सर्व ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य यांचा, तसेच व्यापारी मतदारसंघांमध्ये मार्च महिन्यानंतर नूतनीकरण केलेल्या सर्व सभासदांना नियमाप्रमाणे मतदार म्हणून मतदार याद्यांमध्ये समावेश केला जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे सचिव सतीश कदम हे उपस्थित होते.

निवडणूक लांबल्याने अनेकांचा हिरमोड
बाजार समितीची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजप या सर्व पक्षांत इच्छुकांची मोठी संख्या असून, उमेदवारीसाठी चुरस आहे. मतदार संख्या वाढणार असल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मात्र, निवडणूक सातत्याने पुढे जात असल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

Back to top button