नगर : प्रतिस्पर्धी कोण? विचार करत नाही : खासदार सुजय विखे | पुढारी

नगर : प्रतिस्पर्धी कोण? विचार करत नाही : खासदार सुजय विखे

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : विकासकामे करणे माझे काम आहे. माझ्यात संपर्काचा अभाव आहे, ही माझी निगेटिव्ह बाजू आहे. त्यात मी सुधारणा करू शकत नाही, अशी खंत व्यक्त करत जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील माझा प्रतिस्पर्धी कोण? कोण उमेदवारीसाठी प्रयत्न करतो, याचे देणेघेणे नाही. खासदारकीवर आमचा प्रपंच नाही. मी अनसिक्युअर्ड नाही. पुढील खासदार गोरगरीब जनता ठरवेल, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले.
खासदार डॉ. विखे यांच्यातर्फे सुपा येथे तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, विश्वनाथ कोरडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहोकले, राहुल शिंदे, सचिन वराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, दोन वर्षात केंद्राच्या योजना मतदारसंघात राबविल्या. त्यास पत्रकारांनी प्रसिद्धी दिली. टीकात्मक बातमीमुळे राग धरणार्‍या राजकारण्यांसारखा मी नाही. लोकप्रतिनिधीपेक्षा जनतेचा पत्रकारांवर अधिक विश्वास असतो. त्यामुळे पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्या प्रसिद्ध करून समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे. राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे तसेच जिल्ह्याच्या नेतृत्वाला मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने आचारसंहिता संपल्यानंतर विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे ते म्हणाले. पाच वर्षापूर्वी संकटात लोकसभेची निवडणूक लढविली. कोरी पाटी असल्याने तसेच विकास कामे केलेली नसल्याचे काय होणार हे मलाही माहिती नव्हते. आजोबांची पुण्याई, तसेच मोदींचा चेहरा, यामुळे माझा सहज विजय झाला. यावेळी मात्र प्रचंड विकासकामे झाली आहेत. त्यामुळे आपण निश्चिंत आहोत.

डॉ. विखे यांनी सुजित झावरेंना चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही. माझ्या विरोधात सुजित झावरे उभे राहिले, तर याचा विचार मी का करावा, असा सवाल त्यांनी केला. तुमच्या गाडीत तुम्ही कोणाला घेऊन फिरता? तुमच्या गाडीतील सहापैकी केवळ एकच जण तुमच्याजवळ ठेवण्याची ताकद माझी असल्याचे सांगत विखे यांनी अनेकांना सूचक इशारे दिले. काहींना वाटते विखेंकडे महसूलमंत्री, पालकमंत्रीपद आहे. आपला व्यवसाय चांगला चालवायचा असेल, तर खासदारांच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे. ते माझ्याशी संपर्कही करतात. मात्र, असे प्रवेश आपण करून घेत नाही. प्रशासनाच्या दबावाने कोणालीही जवळ घेता येत नाही.

कितीही प्रवेश करू शकतो
काहींना वाटते विखेंकडे महसूलमंत्री, पालकमंत्रीपद आहे. आपला व्यवसाय चांगला चालवायचा असेल, तर खासदारांच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे. ते माझ्याशी संपर्कही करतात. मात्र, असे प्रवेश आपण करून घेत नाही. प्रशासनाच्या दबावाने कोणालीही जवळ घेता येत नाही. माणुसकीच्या नात्याने माणूस जवळ आला पाहिजे. त्यामुळेच गेल्या दहा वर्षात एकाही व्यक्तीने आपला विश्वासघात केला नाही असे डॉ. विखे यांनी सांगितले.

समाजासाठी वाईटपणा घेण्याची तयारी
राधाकृष्ण विखे महसूल मंत्री झाल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तीन महिने या विभागाने प्रामाणिक काम केले आणि जिल्ह्यात खडी, मुरूम, वाळू मिळणे दुरापास्त झाले. कारण आजवर हे सर्वच जण बेकायदा काम करीत होते. नियमात कोणीही नव्हते. त्यानंतर मोठा उद्रेक झाला. आक्रोष मोर्चा निघाला. मात्र, वाईटपणा घेण्याची हिंमत लागते. समाजासाठी तो वाईटपणा घेण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

ती क्षमता फक्त विखे परिवाराकडे
पारनेर-श्रीगोंदा उपविभगासाठी पाच कोटींचे प्रांत कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये सर्व शासकीय कार्यालये, गौण खनिजाबाबत नियमानुसार कार्यपद्धती, प्रलंबित मोजण्यांवर उपाय म्हणून राज्यातील पायलट प्रोजेक्ट नगर जिल्ह्यात राबविण्यासाठी साडेसहा कोटींची तरतूद आदी लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. यापूर्वीही नगर जिल्ह्याकडे महसूलमंत्रीपद होते. मात्र, बदल काही दिसून आला नाही. ती क्षमता विखे परिवाराकडे असल्याचे सांगत डॉ. विखे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही टोला लगावला.

Back to top button