नगर : थेंबा थेंबानं पिकं झाली हिरवीगार..! | पुढारी

नगर : थेंबा थेंबानं पिकं झाली हिरवीगार..!

नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस शेतीच्या पाणी वापरावर येणारी बंधने लक्षात घेता, आता कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरीही ठिबक, तुषार सिंचनांच्या वापराकडे वळू लागला आहे. गेल्या अडीच वर्षांत 30 हजार 960 शेतकर्‍यांनी तब्बल 21 हजार 27 हेक्टरवरील पिके ही याच सिंचनांचा वापर करून घेतली आहे. तर, शासनानेही ठिबकचा वापर वाढविण्यासाठी अनुदानात 85 टक्केपर्यंत वाढ केल्याने येणार्‍या काळात या सिंचनाच्या थेंबा-थेंबातून शेतशिवारं हिरवाईने नटलेली दिसणार आहेत.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानंतर शेतीच्या पाण्याचा प्रश्न खर्‍या अर्थाने चर्चेत आला. त्यामुळे आता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नवनवीन कायदेही होऊ लागले. यातून शेतीच्या पाण्यावरही निर्बंध वाढताना दिसू लागले. दुसरीकडे शासनाकडूनही शेतकर्‍यांनी पारंपरिक सिंचन पद्धतीत बदलून ठिबक आणि तुषार सिंचनावर शेती करावी, यासाठी प्रोत्साहन सुरू झाले. त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि अनुदान वाटपातून शेतकर्‍यांना आर्थिक हातभारही देऊ केला.

जिल्हा कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांना ठिबक वापरासाठी मार्गदर्शन आणि अनुदानांची माहिती दिली जात आहे.

अल्पभूधारक 80; बहुधारकांना 75 टक्के अनुदान
राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचन खरेदीसाठी अल्पभूधारक शेतकर्‍यांना 55, तर बहुभूधारक शेतकर्‍यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. याशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकर्‍यांना 25 आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना 30 टक्के, अशाप्रकारे अल्पभूधारकांना 80 आणि बहुभूधारकांना 75 टक्क्के अनुदान दिले जात आहे.

ठिबकला अशाप्रकारे मिळतेय अनुदान!
या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी या कृषी विभागाच्या पोर्टलवर अर्ज करावा लागतो. चार बाय दोन फुटांवर ठिबक घेतल्यास हेक्टरी 1 लाख 27 हजार 501 रुपयांचे अनुदान दिले जाते. या पद्धतीने ऊस, हरभरा, कांदा इत्यादी पिकांसाठी ठिबक केले जाते. तर,पाच बाय दोन फूट अशा पद्धतीने फळबागांसाठी केलेल्या ठिबक संच खरेदीला 1 लाख 9 हजार 531 रुपये हेक्टरी अनुदान दिले जाते.

जिल्ह्यात 4965 हेक्टरवर कांदा !
सन 2020-21 आणि 21-22 या दोन आर्थिक वर्षांत जिल्ह्यातील 8025 शेतकर्‍यांनी तब्बल 4965 हेक्टरवरील कांदा पिकासाठी ठिबक अन् तुषार सिंचनाचा वापर केल्याचे पुढे आले आहे. कमी पाण्यात हे कांदा पीक चांगल्या पद्धतीने आल्याने दरवर्षी कांद्यासाठी ठिबकचा वापर वाढताना दिसत आहे.

5744 शेतकर्‍यांचा ऊसही ठिबकवर
कांद्याप्रमाणेच ऊस पिकासाठीही शेतकरी ठिबकचा वापर करू लागला आहे. सन 2020-21 आणि 21-22 या वर्षांत 5744 शेतकर्‍यांनी आपला 4823 हेक्टर ऊसासाठी ठिबकचा वापर केल्याचे कृषी विभागाकडून समजले आहे.

राज्यात नगर दुसर्‍या स्थानावर
ठिबकचा वापर आणि त्यासाठी शासनाने देऊ केलेले अनुदान, याचा विचार करता नगर जिल्हा हा राज्यात दुसर्‍या स्थानी आहे. पहिल्या स्थानावर जळगाव जिल्हा आहे. या ठिकाणी केळीसाठी ठिबकचा मोठा वापर सुरू आहे.

चालू वर्षात 17 कोटींचे वाटप !
सन 21-22 या आर्थिक वर्षात 21 हजार 700 शेतकर्‍यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 45-55 टक्के प्रमाणे 15 कोटी 57 लाख, तर यापैकी 16 हजार 944 शेतकर्‍यांना मुख्यमंत्री योजनेतून 25-30 टक्के प्रमाणे 15 कोटी 37 लाख रुपये दिलेले आहे. उर्वरित शेतकर्‍यांना निधी उपलब्ध होईल, तसा वर्ग केला जाणार आहे. तसेच चालू वर्षात 605 शेतकर्‍यांना राष्ट्रीय विकास योजनेतून 11 कोटी 36 लाख, तर 5023 शेतकर्‍यांना मुख्यमंत्री योजनेतून 6 कोटी 25 लाख देऊ केले आहे. उर्वरित शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.

Back to top button