नगर : वाढीव पाचशे पोलिसांची मागणी : पोलिस अधीक्षक राकेश ओला | पुढारी

नगर : वाढीव पाचशे पोलिसांची मागणी : पोलिस अधीक्षक राकेश ओला

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : जिल्हात सुमारे 14 हजारहून अधिक गुन्हे दरवर्षी दाखल होतात. त्या तुलनेत पोलिस संख्याबळ कमी आहे. यामुळे पोलिस दलावर अतिरिक्त ताण पडत आहे. हा ताण कमी करून पोलिसांची संख्या कशी वाढेल, यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यासाठी वाढीव पाचशे पोलिस कर्मचारी अधिक मिळावे, अशी मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी दिली.  जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओलांनी शनिवारी पाथर्डी पोलिस ठाण्याला भेट दिली. पाथर्डी पोलिस ठाण्याचा दैनंदिन कामाचा आढावा जाणून घेत पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेत आली.

वाढणारे गुन्हे, गुन्ह्यांचा तपास, 112 वरील येणारे कॉल, त्याचे लवकरात लवकर पोहचून निवारण करणे, गुन्हातील जप्त मुद्देमाल, तोमुळ मालकाला परत देण्याबाबत ओलांनी बैठकीत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. कायदा सुव्यवस्था हाताळताना पोलिसांना येणार्‍या अडीअडचणींबाबत माहिती जाणून घेतली. गुन्हे निर्गतीसाठी महत्त्वपूर्ण सूचना ओला यांनी केल्या आहेत. यावेळी पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, सचिन लिमकर आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलिस प्रमुख ओला म्हणाले, आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू आहे. त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था सर्वत्र चांगल्या पद्धतीने राखण्यासाठी भेट दिली जात असून, गंभीर स्वरुपाचे एक हून जास्त गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून चौकशीचे कामकाज सुरू आहे. गुन्हेगारांवर वचक आणि लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन काम करण्याचे मुख्य उद्दिष्ट पोलिस दलाचे आहे. पोलिसांविषयीची असलेली भीती दूर होऊन पोलिस ठाण्यात येणार प्रत्येक तक्रारदार न घाबरता त्याने आपला गुन्हा नोंदवला पाहिजे. त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना तशा सूचना त्यांनी दिल्या.

मुळात जिल्हा पोलिस दलाकडे अपुरी संख्या असून, त्यात वाढ करण्याचा पाठपुरावा सुरू आहे. येणार्‍या काळात मोठ्या पोलिस ठाण्यांचा विस्तार केला जाईल. ज्या ठिकाणी नवीन पोलिस ठाणे निर्माण करायचे, त्या परिसराची भौगोलिक परिस्थिती, गुन्ह्याचे प्रमाण आदींचा विचार करून नवीन पोलिस ठाण्यांसाठी चांगल्या पद्धतीने पाठपुरावा सुरू असल्याचेही ओला म्हणाले.

Back to top button