नगर : शिक्षणाधिकार्‍यांच्या पत्राला केराची टोपली

नगर : शिक्षणाधिकार्‍यांच्या पत्राला केराची टोपली

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षकांच्या पगारपत्रकासाठी वापरण्यात येणार्‍या शालार्थ वेतन प्रणालीचे आयडी, पासवर्ड वापराबाबत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना सूचना केल्यानंतरही आठ दिवस उलटूनही अद्याप एकही अहवाल मुख्यालयात पोहचलेला नसल्याने हे प्रकरण आणखी संशयास्पद बनल्याची चर्चा सुरू झाली आहे. 'शिक्षकांच्या पगारासाठी हातोहात यंत्रणा' या 'पुढारी'मधील वृत्तानंतर शिक्षणाधिकारी पाटील यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना एक पत्र काढले होते. शिक्षकांचे पगाराचे देयके तयार करण्याची जबाबदारी ही त्या मुख्याध्यापकांची आहे. मुख्याध्यापकांनी प्रणालीत भरलेली माहिती प्रमाणित करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकार्‍यांची आहे.

शिक्षणाधिकारी हे पर्यवेक्षक संनियंत्रक आहेत. भविष्यात पगारासंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाल्यास मुख्याध्यापकाची सर्वस्वी जबाबदारी असल्याचे आदेश डिसेंबर 2021 मध्ये जिल्हा परिषदेने दिलेले आहेत. असे असतानाही काही मुख्याध्यापकांकडे असलेला आयडी, पासवर्डबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने, सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांनी वस्तूस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांत मुख्यालयात सादर करावा, अशा सूचना शिक्षणाधिकारी पाटील यांनी लेखी पत्राव्दारे केल्या होत्या. त्यामुळे या अहवालाकडे सर्वच शिक्षकांचेही लक्ष लागले होते.

मात्र आठ दिवस उलटून गेले, तरीही एकाही तालुक्याचा अहवाल गटशिक्षणाधिकार्‍यांकडून शिक्षणाधिकार्‍यांकडे सादर झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून समजली. त्यामुळे शिक्षणाधिकार्‍यांनी काढलेल्या पत्रालाही केराची टोपली दाखवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गटशिक्षणाधिकार्‍यांनी संबंधित अहवाल पाठविलेला नसल्याने हे प्रकरण आणखी संशय निर्माण करणारे बनले असून, याप्रकरणी शिक्षणाधिकारी पाटील हे आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

क्रीडांगणाबाबतही शिक्षणाधिकारी गप्प का?

जिल्हा परिषदेच्या 57 शाळांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन लाख रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. काही शाळांनी क्रीडांगणाचे बीलेही अदा केलेली आहे. मात्र या प्रक्रियेत मोठा गोंधळ असतानाही शिक्षणाधिकारी गप्प का आहेत, त्यांनी याप्रकरणात कोणती चौकशी केली, सीईओंची भूमिका काय? या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. त्यामुळे क्रीडांगणावरील 'खेळाडू' बाबतही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news