नगर : ई-फायलिंगला वकिलांचा विरोध | पुढारी

नगर : ई-फायलिंगला वकिलांचा विरोध

 पुढारी वृत्तसेवा :  न्यायालयाचे कामकाज ई-फायलिंगद्वारे चालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देले आहेत. ई-फायलिंगच्या निर्णयास नगर जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांचा विरोध असून, वकील संघटनेने या निर्णयाचा निषेध करत शुक्रवारी (दि.20) लाल फिती लाऊन कामकाज केले. वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या बंधनकारक निर्णयास सर्व वकिलांनी जाहीरपणे विरोध करत तसा ठराव एकमताने मंजूर करणात आला. त्या ठरावाच्या प्रती दिल्ली सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, नगर जिल्हा सत्र न्यायालय व महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षांना पाठविण्यात आल्या आहेत. न्यायालयाबाहेर वकिलांनी निर्णयाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

यावेळी अ‍ॅड. पाटील म्हणाले, न्यायालयात ई-फायलिंगद्वारे दावा दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ, खर्चिक व गुंतागुंतीची आहे. त्यासाठी वकिलांकडे अद्ययावत संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, स्मार्ट मोबाईल फोन आदी आवश्यक तंत्रज्ञान नाही. यासर्व खर्चिक बाबी वकिलांना न परवडणार्‍या आहेत. येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. इंटरनेटचा स्पीडही कोर्टाच्या इमारतीत मिळत नाही. त्यामुळे निर्णय बंधनकारक करू नये, अशी मागणी करण्यात आली.

Back to top button