नगर : केंदळ खुर्द-मानोरी रस्त्याचा प्रस्तावही परत

वळण : पुढारी वृत्तसेवा : केंदळ खुर्द-मानोरी येथील कोल्हापूर टाईप केटीवेअर शेजारील ओढ्यावर तुटलेल्या पुलाच्या नवीन बांधकामास दोन- तीन वर्षांपासून मुळा पाटबंधारे विभागाला पुरेसा निधी उपलब्ध करता येईना. त्यामुळे पर्यायी रस्त्यास स्वतःच्या शेतातून जागा दिलेल्या शेतकर्याने थेट जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे शेतातील रस्ता बंद करून, भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. यामुळे आता तात्पुरत्या स्वरूपात कच्चा पूल उभारून चालू असलेला रस्ताही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या पुलासाठी माजी खा. प्रसाद तनपुरे व माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत सतत पाठपुरावा करून सुमारे 22 लाख 46 हजार रुपये मंजूर केले होते. तो निधीही परत गेल्याने आता पुन्हा प्रस्ताव पाठवून कधी निधी मंजूर होणार, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. जे काम 22 ते 25 लाखांमध्ये व्यवस्थित पूर्ण होणार होते, त्या कामास भविष्यात एक ते सव्वा कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. काम केव्हा होईल व कोण निधी मंजूर करणार हा प्रश्न दोन्ही गावच्या ग्रामस्थ, वाहनचालकांपुढे निर्माण झाला आहे.
राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द-मानोरी येथे मुळा नदीवर कोल्हापूर टाईप केटी वेअर शेजारी मानोरी बाजूने ओढ्यावर असलेला पूल तीन- चार वर्षांपूर्वी नादुरुस्त होऊन धोकादायक झाला होता. तेव्हापासून दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी माजी खा. प्रसाद तनपुरे व माजी राज्यमंत्री प्राजक तनपुरे यांची वारंवार भेट घेऊन पुलाच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली लावून धरली होती. दोन वर्षांपूर्वी पूल पहाटेच्या सुमारास जमीनदोस्त झाला. तेव्हा सुदैवाने तो कोसळण्यापूर्वीच एक महिला मजुरांनी भरलेली रिक्षा पाच मिनिटांपूर्वी त्यावरून गेली होती.
त्यावेळी कोणतीही जीवित हाणी झाली नाही. अशा दृष्टीने आवश्यक असलेला. तीन- चार गावांना जोडणारा, महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता आहे. यासर्व बाबीची, मागणीची दखल घेत तनपुरे यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री मेहुणे जयंत पाटील यांच्याकडून गेल्या वर्षी प्राधान्याने या पुलाच्या कामासाठी सुमारे 22 लाख 46 हजार रुपये मंजूर करून घेतले. तातडीने टेंडर ऑर्डर निघून ठेकेदाराने काम ही सुरू केले होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही.