नगर : झेडपीतील लेटलतीफ कर्मचार्‍यांना नोटिसा | पुढारी

नगर : झेडपीतील लेटलतीफ कर्मचार्‍यांना नोटिसा

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत बायोमेट्रीक प्रणालीतून कर्मचार्‍यांना वेळ आणि शिस्तीचेही धडे मिळत असल्याने ती उपयुक्त ठरत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनीही लेटलतीफांवर कारवाईचे आदेश केलेले आहेत. मात्र अनेक विभागात हे आदेश कागदावरच असताना, शिक्षण विभागाने मात्र निर्धारीत दिवसांपेक्षा अधिक काळ उशीरा आलेल्या नऊ कर्मचार्‍यांना वेतन कपात का करू नये, याबाबतच्या नोटीसा बजावल्याचे सूत्रांकडून समजले.

जिल्हा परिषदेत बायोमेट्रीक प्रणाली कार्यान्वित आहेत. प्रत्येक विभागातील कर्मचार्‍यांची हजेरीही त्या त्या विभागप्रमुखांच्या नजरेखाली असते. त्यामुळे आपले कोणते कर्मचारी, किती वेळा उशीरा येतात, हे त्यांना माहिती असते. अशा कर्मचार्‍यांना वेळेचे धडे देण्याबाबत सीईओंनी यापूर्वीही विभागप्रमुखांना कळविलेले आहे. मात्र प्रत्यक्षात काही विभागप्रमुखच बायोमेट्रीक पाळत नसल्याने अन्य कर्मचार्‍यांवर कारवाईचा विषयच पुढे येत नव्हता. मात्र शिक्षण विभागाने हे धाडस दाखवले असून, शिक्षणाधिकारी पाटील यांनी महिन्यांतून तीनपेक्षा अधिक वेळा उशीरा आलेल्या नऊ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्याचे सूत्रांकडून समजले. दरम्यान, या कारवाईने आता अन्य विभागातूनही उशीरा येणार्‍या कर्मचार्‍यांना नोटीसा बजावल्या जाणार असल्याचे समजते. सीईओ स्वतः याचा आढावा घेणार असल्याचेही सांगितले जाते.

कर्मचार्‍यांचाही विचार व्हावा !

सकाळी 10.30 या वेळेवर मुख्यालयात पोहचण्यासाठी कर्मचार्‍यांना मोठी धावपळ करावी लागते. यातही उशीरा झाला,तर कारवाईची टांगती तलवारच आहे. सायंकाळी कामाची वेळ संपली, तरी अनेक कर्मचारी काम करत असतात. त्यामुळे कर्मचार्‍यांना एकदा तरी संधी दिली जावी. त्यानंतर कारवाई व्हावी. तसेच अनेक विभागप्रमुख हे बायोमेट्रीक पाळत नाही. त्यांनाही बायोमेट्रीक सक्तीची करावी, अशी चर्चा कर्मचार्‍यांमध्ये होत आहे.

 

Back to top button