नगर : बीओटीवर उभारणार 49 शाळा ! | पुढारी

नगर : बीओटीवर उभारणार 49 शाळा !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे, तसेच विद्यार्थ्यांनाही भौतिक सुविधा मिळाव्यात, इत्यादी विशाल हेतूने बीओटी तत्त्वावर शाळांची कामे करण्यासाठी प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे 49 शाळांची कामे प्रस्तावित असून, त्यासाठी वास्तू विशारदांकडून याकामाच्या रेखाटनासाठी निविदाही मागाविण्यात आल्या आहेत. नगर जिल्हा परिषद ही जलजीवन योजना, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण, कृषी, आरोग्य, बांधकाम अशा सर्वच विभागात घोडदौड करत आहे. याकामी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. शाळा खोल्यांच्या बांधकामाचा प्राधान्यक्रम ठरविल्यानंतर आता ज्या शाळा रस्त्यालगत आहेत, ज्या ठिकाणी व्यवसायवृद्धीसाठी ती जागा मौल्यवान आहे, अशा ठिकाणी बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा, या तत्वावर शाळा खोल्यांची कामे करण्यासाठी अतिरीक्त सीईओ लांगोरे यांनी पुढाकार घेतला आहे.

सात्रळ, कोल्हार,  लोणीत यशस्वी प्रयोग

सन 2007 मध्ये शालिनीताई विखे पाटील अध्यक्षा असताना त्यांनी शासनाच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी बोओटीचा विचार केला. याच बीओटी तत्वावर झेडपीच्या मोडकळीस आलेल्या शाळा नव्याने उभारणीसाठी त्यांनी नगरमध्ये पहिला प्रयोग केला होता. त्यासाठी सात्रळ, कोल्हार आणि लोणीतील शाळांची निवड केली.

उत्तरेत 32 अन्  दक्षिणेत 17 शाळा बांधणार

चालू वर्षात बीओटी तत्त्वावर उत्तरेत 32 आणि दक्षिणेत 17 शाळांची कामे करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. संबंधित शाळा ह्या रस्त्यालगत आहेत. त्या परिसरात नागरीकांची वर्दळ आहे. वाहतूकीची व्यवस्था आहे, वीज, पाणीही उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसायासाठी या जागेचा विकास करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. संबंधित जागा, त्याची मूळ कागदपत्रे तपासली गेली आहेत. त्यानंतरच आता संबंधित जागांवर कशाप्रकारे व्यापारी संकुल अथवा अन्य प्रकारे व्यवसायिक आकर्षित होऊ शकती, या हेतूने डिझाईन तयार करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.

त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. यातून संपूर्ण रेखाटन अहवाल तयार होऊन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यानंतर खर्‍याअर्थाने ही कामे मार्गी लागतील. अर्थात, त्या ठिकाणी व्यापार्‍यांनी योगदान दिल्यास झेडपीची शाळा, त्यांची जागा सुरक्षित राहीलच, शिवाय या कामात गुंतवणूक करणार्‍या व्यापार्‍यांचे व्यवसायही चांगले चालणार आहेत.

पालकमंत्र्यांचा जिल्हा ठरणार आदर्श!
बीओटी तत्वावर शाळा उभारणीचा प्रयोग दिशादर्शक आहे. यापूर्वीही शालिनीताई विखे पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना त्यांनी सात्रळ, लोणी आदी शाळा बीओटीवर उभारल्या होत्या. त्यामुळे आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या उपक्रमात मार्गदर्शन केल्यास नगर झेडपी राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

Back to top button