नगर : श्रीगोंद्याचे द्राक्ष यंदाही खाणार भाव ! | पुढारी

नगर : श्रीगोंद्याचे द्राक्ष यंदाही खाणार भाव !

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील द्राक्ष विक्रीस येत्या 26 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. सुरुवातीलाच 55 ते 65 रुपये किलोचा दर मिळाल्याने चालू वर्षी द्राक्षाला भाव चांगला मिळेल, असे मत द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा हा द्राक्ष बागांसाठी राज्यात प्रसिद्ध असणारा तालुका. तालुक्यात जवळपास एक हजार आठशे एकर वर द्राक्ष बागा आहेत. विशेषतः पारगाव सुद्रिक या गावात द्राक्षाच्या शेकडो एकर बागा आहेत. त्याचबरोबर आढळगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदा, कोळगाव, घोटवी यासह इतर गावांत द्राक्ष बागा आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून उत्पादन, उत्पादन खर्च व मिळणारा भाव, याचा ताळमेळ बसत नसल्याने द्राक्षउत्पादक शेतकर्‍यांची तारेवरची कसरत होते. खतांच्या किंमती दुप्पट झाल्या. तुलनेत द्राक्षाचे दर विशेष वाढले नाहीत. गेल्या तीन वर्षांत, तर तीस ते चाळीस रुपये दराने द्राक्षाची विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. 26 जानेवारीपासून पारगाव येथील द्राक्ष बागांची विक्री सुरू होणार आहे. काही द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी 55 ते 65 रुपये किलोप्रमाणे व्यापार्‍यांशी सौदे केले आहेत. सुरुवातीला दर चांगला मिळत असला, तरी फेब्रुवारीत हा दर काही प्रमाणात कमी होत असल्याचे द्राक्षउत्पादक शेतकर्‍यांचे मत आहे. मात्र, यावर्षी दर कमी झाला तरी तो चाळीस रुपयांच्या आत येणार नाही, असाही अंदाज व्यक केला जात आहे.

द्राक्ष पिकाचे अभ्यासक माऊली हिरवे म्हणाले, चालू वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने त्याचा द्राक्ष बागावर अनुकूल परिणाम झाला आहे. एकरी उत्पादनही चांगले मिळणार आहे. चालू वर्षी द्राक्षाच्या भावात जरी चढ-उतार झाले, तरी चांगले भाव टिकून राहतील, असा अंदाज आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी शरद जमदाडे म्हणाले, अजून बागा सुरू होण्यास दहा ते पंधरा दिवसांचा अवधी बाकी आहे. हवामान चांगले राहिल्याने एकरी उत्पादन चांगले निघणे अपेक्षित आहे.

शीतगृहाची निर्मिती काळाची गरज
तालुक्यात द्राक्ष बागांचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. भावाबाबत अस्थिरता असल्याने अनेक वेळा शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. तालुक्यात होणारे विक्रमी उत्पादन लक्षात घेता द्राक्ष छाटणी केल्यानंतर ते साठवणुकीसाठी शीतगृहाची सोय झाल्यास त्याचा शेतकर्‍याच्या आर्थिक उत्पादनावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

Back to top button